पुणे जिल्ह्यातील पारगावमध्ये एका उसाला तब्बल ४३ कांडे

जुन्नर (पुणे ) : जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे आळे येथील प्रगतशील शेतकरी विक्रम तट्टू यांनी ऊस शेतीत नवा आदर्श निर्माण केला आहे. आपल्या ३ एकर शेतात त्यांनी ८६०३२ जातीच्या आडसाली उसाचे भरघोस उत्पादन घेतले असून, एका उसाची लांबी तब्बल ४३ कांड्यांपर्यंत पोहोचली आहे. त्यांच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली. या आदर्शवत शेतीचा प्रयोग पाहण्यासाठी परिसातील शेतकरी गर्दी करताना दिसत आहेत. या यशस्वी प्रयोगामुळे विक्रम तट्टू यांचे सर्वत्र कौतुक होत असून, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास ऊस शेती कशी फायदेशीर ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
असे केले नियोजन:
लागवड पद्धत: साडेचार फुटांची सरी सोडून दोन डोळ्यांच्या पद्धतीने घरच्याच बेण्याची लागवड केली.
खत व्यवस्थापन: एकरी एक ट्रक शेणखत, कारखान्याच्या प्रयोगशाळेतील जीवाणू खते आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर.
आधुनिक तंत्रज्ञान: कीड व रोग नियंत्रणासाठी ड्रोनद्वारे फवारणीचा वापर केला.
उत्पादन आणि नफा:
कमी खर्च: एवढ्या मोठ्या उत्पादनासाठी त्यांना एकरी केवळ ५० हजार रुपये खर्च आला.
विक्रमी टनेज: पहिल्या एकरच्या तोडणीतून १०१ टन उत्पादन मिळाले आहे. संपूर्ण ३ एकरातून ३०० ते ३२५ टन उत्पादनाची अपेक्षा आहे.
आर्थिक फायदा: खर्च वजा जाता सुमारे ९ लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळण्याची शक्यता तट्टू यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी सत्यशील शेरकर यांनी तट्टू यांच्या कष्टाचे अभिनंदन केले. “विघ्नहर कारखाना प्रशासन नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. गाळप हंगाम सुरू झाल्यापासून आम्ही स्वतः शेतात जाऊन तोडणीच्या कामाचा आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा आढावा घेत आहोत,” असे शेरकर यांनी यावेळी नमूद केले.






