राज्यात आतापर्यंत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण

पुणे : १ नोव्हेंबर २०२५ पासून राज्यात ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राज्यात सद्यस्थितीत ३३६ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झालेले आहे. तर ८.२७ टक्के निव्वळ साखर उताऱ्यानुसार २७ लाख ८३ हजार मेट्रिक टन नवे साखर उत्पादन तयार झाल्याची माहिती साखर आयुक्तालयातून जारी करण्यात आली आहे. यामध्ये पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ कोल्हापूर विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे.
गेल्या वर्षीच्या हंगामाचा विचार करता यावर्षी दुप्पट ऊस गाळप व साखर उत्पादन घेण्यात आले आहे. पुणे विभाग ८० लाख मेट्रिक टनांइतके सर्वाधिक ऊस गाळप करून प्रथम क्रमांकावर, तर कोल्हापूर विभाग ७७.९८ लाख मेट्रिक टन गाळपासह दुसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे, ९.६५ टक्क्यांइतका सर्वाधिक निव्वळ साखर उतारा कोल्हापूरचा असून, या विभागाने सर्वाधिक ७४.८८ लाख क्विंटलइतके साखरेचे उत्पादन केले आहे. दरम्यान, ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उताऱ्यात कोल्हापूर विभाग अग्रस्थानी राहण्याचा अंदाजही वर्तविण्यात येत आहे.






