साखरेच्या किमान विक्री किमतीत २५ टक्के वाढ करा

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी
नवी दिल्ली : साखरेचा सध्याचा किमान दर ३,१०० वरून ३,९०० रुपये प्रतिक्विंटल करण्याची शिफारस राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने नुकतीच केंद्रीय मंत्रालयाचे सचिव, संजीव चोप्रा यांना पत्राद्वारे केली आहे. महासंघाने मंत्रालयाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आगामी २०२५-२६ या साखर हंगामात साखरेचा किमान विक्री दर ही ३,१०० रुपये प्रतिक्विंटलवरून ३,९०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत वाढविण्यात यावी म्हणजेच साखरेच्या किमान विक्री किमतीमध्ये २५ टक्के वाढ करावी. जेणेकरून सहकारी साखर कारखान्यांना फायदा होईल आणि साखरेच्या दरात स्थिरता येईल. या बदलामुळे महागाईवर कोणताही परिणाम होणार नाही. सध्याच्या मंत्रालयाने ठरवलेला सध्याचा किमान विक्री दर ३,१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. महासंघाने पत्रात स्पष्ट केले आहे की, या परिस्थितीचा विचार करता, उत्पादनाचा खरा खर्च दर्शवण्यासाठी किमान विक्री किंमत वाढवणे आवश्यक आहे.
३५ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज
यंदाच्या अनुकूल पावसाळ्यामुळे २०२५-२६ च्या आगामी साखर वर्षात तब्बल ३५ दशलक्ष टन साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यापैकी, ४.५ दशलक्ष टन इथेनॉल उत्पादनासाठी आणि २ दशलक्ष टन निर्यातीसाठी वापरली जाईल. यावर्षी एकूण साखर उत्पादन सुमारे ३१ दशलक्ष टन असेल, जे मागील वर्षीच्या ३४ दशलक्ष टनांपेक्षा कमी आहे. देशांतर्गत वापरासाठी २६.२ दशलक्ष टन साखर उपलब्ध असेल, असा अंदाज आहे.
महागाईवर परिणाम होणार नाही
या वाढीमुळे ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही; कारण सध्याचे बाजारभाव या दरांशी आधीच जुळलेले आहेत. हा निर्णय सध्याच्या दरांना कायदेशीर आधार देईल आणि उद्योगात स्थिरता आणण्यास मदत करेल. सध्याच्या वाजारपेठेत बाजारपेठेतील किरकोळ दरांचा महागाई निर्देशांकावर परिणाम होत नाही, असेही पत्रात नमूद केले.