ऊस तोडणी मजुरांना विमा लागू करण्याचे प्रयत्न : गुलाबराव पाटील

परभणी : साखर उद्योगात काम करणाऱ्या बंजारा समाजातील ३५२ ऊस तोडणी कामगारांचा गेल्या वर्षभरात सर्पदंशाने मृत्यू झाला. त्यांच्या वारसांना आर्थिक आधार मिळावा यासाठी जीवनविमा योजना लागू करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
परभणी जिल्ह्यातील गोदावरी तांडा (ता. गंगाखेड) येथे आयोजित ऊसतोड कामगारांच्या महामेळाव्यात मंत्री पाटील बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार रत्नाकर गुट्टे, गोर ऊसतोड कामगार सेनेचे अध्यक्ष अरुण चव्हाण, कर्नाटक गोरसेनेचे रविकांत बागडी, गोदावरी तांडाचे सरपंच नामदेव पवार आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, साखर उद्योगातील तोडणी मजूरांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू. इतर कामगारांप्रमाणेच ऊसतोड कामगारांना माध्यान्ह भोजन मिळावे. त्यांच्या पाल्यांसाठी स्वाधार योजना लागू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू.
राठोड म्हणाले की, ‘‘ऊस हंगामात अनेक तोडणी कामगारांचे मृत्यू सर्पदंशाने होतात, त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. त्यांच्या वारसांना मदत मिळवून देणे, गरोदर ऊसतोड कामगारांना ६ महिन्यांचे वेतन देणे यांसह कामगारांना ओळखपत्र, कामगार विभागात नोंदणी करून त्यांना इतर कामगारांप्रमाणे सरकारी योजना लागू करण्यासाठी प्रयत्न केले जातील.