‘श्री विठ्ठल’चे चेअरमन अभिजित पाटील यांना अंतरिम जामीन
सोलापूर – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडील थकीत कर्ज वसुलीच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्यावतीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या लेखी तक्रार प्रकरणी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी (दि. २४) येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने मंजूर केला.
राज्य सहकारी बँकेने श्री विठ्ठल साखर कारखान्यास मागणीनुसार वेळोवेळी कर्ज दिलेले आहे. त्यापोटी कारखान्याच्या मालकीची स्थावर व जंगम मालमत्ता गहाणखताने दिलेली आहे. मात्र, कराराप्रमाणे परतफेड न केल्याने कारखान्याचे कर्जखाते अनुत्पादित (एनपीए) झाले आहे. सदर कर्ज व व्याज भरण्याबाबत बँकेने २०२१ मध्ये कायदेशीर नोटीस पाठविली होती. दरम्यान, बँकेची परवानगी न घेता कारखान्याकडील उत्पादित साखरेसह जोड उत्पादनांची विक्री करण्यात आली.
याद्वारे बँकेस आर्थिक नुकसान पोहोचविण्याच्या हेतुने वर्तन केल्याने चेअरमन पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाविरूद्ध फसवणूक व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करावा, अशा आशयाची लेखी तक्रार बँकेचे प्राधिकृत अधिकारी कैलास घनवट यांनी दि.१२ जानेवारी रोजी तालुका पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर आरोप-प्रत्यारोपांनी तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.
दरम्यान, चेअरमन अभिजीत पाटील यांनी अॅड. सिद्धेश्वर चव्हाण यांच्या मार्फत येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पाटील यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला. सरकार पक्षातर्फे अॅड. गोरे यांनी, तर चेअरमन पाटील यांच्या तर्फे अॅड. सिद्धेश्वर चव्हाण यांनी काम पाहिले.