वसाकाच्या सभासद, कामगारांचे भविष्य अधांतरी?

नाशिक : मागील आठवड्यात वसंतदादा सहकारी साखर कारखाना (वसाका) पुन्हा सुरू करावा, यासाठी आमरण उपोषण करण्यात आले होते. कारखान्याची विक्री प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने ‘वसाका’तील २८ हजार सभासद आणि ७०० कामगारांचे भविष्य अधांतरी राहणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर वसाका पुन्हा सुरू झाला पाहिजे यासाठी एकजुटीने संघर्षाची गरज असल्याने नुकताच वसाका मजदूर युनियनकडून शिखर बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयावर बिराड मोर्चा काढण्याचा स्पष्ट इशारा दिला आला आहे. यावर त्वरित आणि योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलनाच्या ज्वाळा अधिक तीव्र होतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या (वसाका) विक्रीची प्रक्रिया अखेर अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या २० ऑगस्ट २०२५ रोजी कारखान्याची ही ऑनलाईन लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भातील अधिकृत नोटीसही वसाका कारखान्याच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आली आहे. या निर्णयास विरोध असूनही विक्री प्रक्रिया पुढे नेण्यात येत असल्याने कामगार आणि सभासदांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे कारखान्याचा खरेदीदार मिळाला तरी प्रत्यक्ष विक्री होऊ शकेल का, याबाबतही शंका निर्माण झाली आहे. दुसरीकडे, कारखाना सुरु राहावा यासाठी प्रयत्नशील असलेले कामगार, माजी कर्मचारी व सभासदांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.
सध्या कारखान्याची एकूण अंदाजे मालमत्ता ४०० कोटी रुपयांच्या पुढे असून, एकूण थकित देणी ३०० कोटींच्या वर आहेत. त्यामुळे विक्री झाली तरी त्या रकमेत सर्व थकबाकी फिटेल का, आणि कर्मचाऱ्यांचे हक्क शिल्लक राहतील का, असे अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे प्रॉव्हिडंट फंडाची दोन खाती एकत्र करण्याची गरज असून, ग्रॅज्युएटी, फायनल पेमेंट, थकित वेतन तसेच रोजगाराचा प्रश्न सुटावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
‘एनसीडीसी’च्या थकबाकीच्या आधारे विक्रीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात कारखान्यावर सर्वाधिक कर्ज हे इतर राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांचे आहे. यामध्ये शिखर बँकेचे सुमारे १२४ कोटी, कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन, प्रॉव्हिडंट फंड व इतर मिळकती मिळून ४१ कोटी, एचडीएफसी बँकेचे ३४ कोटी तसेच इतर बँकांचेही कोट्यवधी रुपयांचे कर्ज प्रलंबित आहे.