15-20 लाख टन साखर निर्यातीची परवानगी द्या : ISMA

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : भरघोस उत्पादन आणि मार्केटमधील मुबलक साठा पाहता, १५ ते २० लाख टन साखर निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (ISMA) ने केंद्राकडे केली आहे.

जुलैच्या अखेरीस किंवा पुढील महिन्याच्या सुरुवातीला निर्यातीबाबत निर्णय अपेक्षित आहे, अशी आशा ISMA चे महासंचालक दीपक बल्लानी यांनी व्यक्त केली आहे.

“चालू हंगाम संपेपर्यंत (30 सप्टेंबर) देशात जवळपास ९० लाख टन इतका मोठा साखर साठा असेल. देशांतर्गत ग्राहकांची गरज भागवण्यासाठी 5.5 दशलक्ष टन एवढी सुरक्षित साठा पातळी असल्याचे सरकारचे मत आहे. हे लक्षात घेता, सुमारे 3.6 दशलक्ष टन साखर अतिरिक्त असेल,” असे बल्लानी म्हणाले.

पुढील वर्षाचे अंदाज आणखी चांगले राहण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वी जो अंदाज वर्तवण्यात आला होता त्यापेक्षा आगामी हंगाम खूप चांगला राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

देशांतर्गत वापर आणि इथेनॉल मिश्रण मिशनच्या गरजा पूर्ण करूनदेखील, निर्यातीसाठी सुमारे 1.5 ते 2 दशलक्ष टन म्हणजेच १५ ते २० लाख टन साखर उपलब्ध राहील, असे बल्लानी म्हणाले.
बल्लानी यांनी सरकारच्या 20% इथेनॉल मिश्रणाच्या लक्ष्यासाठी आवश्यक असलेल्या 988 कोटी लिटरपैकी 55% पुरवठा करण्याच्या साखर उद्योगाच्या वचनबद्धतेबद्दल देखील उहापोह केला. पुढील हंगामाचा अंदाज इस्माच्या वतीने या महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर होईल. ३० जुलैला पहिला अंदाज प्रसिद्ध होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

सरकारने नुकतीच पुढील वर्षासाठी एफआरपी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर साखरेचा वाढलेला उत्पादन खर्च पाहता एमएसपीमध्येही वाढ करण्याची गरज आहे. २०१९ नंतर त्यात एकदाही वाढ झालेली नाही, एमएसपी आणि एफआरपी एकमेकांना निगडित करण्याचा प्रस्ताव इस्माने केंद्राला दिला आहे, असे बल्लानी म्हणाले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »