गुऱ्हाळघरांमध्ये घातक पदार्थ जाळल्याने प्रदूषणात वाढ; ग्रामस्थांची तक्रार

कोल्हापूर : गुऱ्हाळघरांमध्ये सध्या उसाचा रस उकळण्यासाठी इंधन म्हणून प्लास्टिक, रबर, कुशन आणि तत्सम घातक पदार्थ जाळले जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत, त्यामुळे हवेत विषारी वायू प्रदूषण निर्माण होत आहे.. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे.. यापार्श्वभूमीवर राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा, तळाशी, तुरंबे, तिटवे, चंद्रे ग्रामस्थांनी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करून प्रदूषण थांबवण्याची मागणी केली आहे.
तालुक्यात गुऱ्हाळांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. संबंधित चालक गुऱ्हाळघरांच्या भट्टीसाठी उसाच्या चिप्पाडांऐवजी आरोग्यास घातक टायर, चप्पला, प्लास्टिक कागद आदींचा खुलेआम वापर करत आहेत. या ज्वलनशील पदार्थांच्या धुरामुळे प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यात प्लास्टिक बंदी असताना देखील खुलेआम प्लास्टिकचा वापर केला जात आहे. काही गुऱ्हाळे तर शाळेलगत व लोकवस्तीजवळ असून निर्माण होणाऱ्या या धुरापासून शालेय विद्यार्थी व नागरिक यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी चाललेल्या या खेळाकडे मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि अन्न व औषध प्रशासन मंडळ यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या गुऱ्हाळांवर प्रदूषण नियंत्रण विभागाने कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.