‘जयभवानी’च्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित
गेवराई : जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अमरसिंह पंडित यांची, तर व्हाइस चेअरमन पदी भाऊसाहेब नाटकर यांची बिनविरोध निवड झाली. या कारखान्यावर लिपिक म्हणून नोकरीस लागलेले नाटकर त्याच कारखान्याचे उपाध्यक्ष झाल्याने त्यांना भावना अनावर झाल्या.
सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त करत साखरेबरोबर इथेनॉलसारख्या उपपदार्थाचे उत्पादन करून उसाला विक्रमी भाव देण्याची ग्वाही चेअरमन अमरसिंह पंडित यांनी दिली.
जयभवानी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. नूतन संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी समृत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि चेअरमन आणि व्हाइस चेअरमन यांची निवड करण्यात आली.
या बैठकीला संचालक नारायणराव नवले, गणपतराव नाटकर, साहेबराव चव्हाण, शंकरराव तौर, जगन्नाथ शिंदे, आप्पासाहेब गव्हाणे, श्रीराम आरगडे, संभाजी पवळ,कुमारराव ढाकणे, राजेंद्र वारंगे, विजयकुमार घाडगे, नंदकिशोर गोर्डे, रहेमतुल्ला पठाण, बाबुराव काकडे, भिमा मोरे, सौ. संध्या आसाराम मराठे, सौ. शंकुतला संदिपान दातखिळ, जगन्नाथ काळे, रावसाहेब देशमुख आदींची उपस्थिती होती.