उसाचा रस ग्रहण करत सोडला वर्षभराचा उपवास
छत्रपती संभाजीनगर : काहींनी वर्षभर तर काहींनी ३ वर्ष, ४ वर्ष उपवास केले. अशा १८ राज्यांतील ३४१ भाविकांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे आचार्यश्री महाश्रमणजींच्या साक्षीने एकाचवेळी उसाचा रस ग्रहण करत उपवास सोडला.
‘एक दिवस उपवास, एक दिवस जेवण’ असे करत वर्षभर उपवास करणाऱ्या उपवासधारकांना आचार्यश्रींचे दर्शन घडले, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरील थकवा निघून गेला होता. नवचैतन्य निर्माण झाले होते. हा क्षण पाहून अनेकांच्या मनात उपवास करण्याची भावना निर्माण झाली आणि त्याचवेळी शेकडो भाविकांनी पुढील वर्षभर उपवास करण्याचा संकल्प केला.
जैन श्वेतांबर तेरापंथ धर्म संघाचे ११ वे आचार्यश्री महाश्रमणजींच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी ‘अक्षय्य तृतीया वर्षतप पारणा महोत्सव’चे आयोजन करण्यात आले होते. चिकलठाणा एमआयडीसी परिसरातील प्रेसिडेंट लॉन्सच्या पाठीमागील बाजूला असलेल्या जागेवर भव्य मंडप उभारण्यात आला होता.
धर्मपीठावरून उपवासधारकांचे नाव घेतले जात होते व उपवासधारक छोट्या वाटीत उसाचा रस घेऊन रांगेत उभे होते. नंबर आल्यावर आचार्यश्रींचे आशीर्वाद घेत व समोर ठेवलेल्या भांड्यात थोडा थोडा उसाचा रस टाकत होते.
त्यानंतर सर्व उपवासधारकांनी उसाचा रस पिऊन उपवास सोडला. या सोहळ्याला सकल जैन समाजाचे अध्यक्ष राजेंद्र दर्डा यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी आचार्यश्री महाश्रमण अक्षय्य तृतीया प्रवास व्यवस्था समितीचे अध्यक्ष सुभाष नहार, डॉ. अनिल नहार, सुनील राका, राजेंद्र डोसी, संजय सेठिया, महेंद्र सुराणा, कौशिक सुराणा, अंकुर लुणिया, राजकुमार बांठिया, तेरापंथ युवक परिषदेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.
२५ उपवासधारकांचा समावेश
वर्षभर उपवास करणाऱ्या ३४१ भाविकांमध्ये २५ जण छत्रपती संभाजीनगरातील आहेत. त्यात तेरापंथी समाजातील १४ व सकल जैन समाजातील ११ भाविकांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील १२९ भाविकांनी वर्षतप पारणा केला.