जकराया कारखाना उच्चांकी दर देणार : ॲड. जाधव
सोलापूर : जकराया साखर कारखान्यांकडून यंदाच्या गळीत हंगामासाठी इतर कारखान्यांच्या तुलनेत उच्चांकी दर दिला जाईल, अशी घोषणा कारखान्याचे संस्थापक चेअरमन अॅड. बी. बी. जाधव यांनी येथे केली.
वटवटे (ता. मोहोळ) येथील जकराया साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रमात ते बोलत होते.
अॅड. जाधव म्हणाले, यंदा समाधानकारक पाऊस, भरलेले उजनी धरण व कारखान्याच्या विविध उपक्रमांमुळे कार्यक्षेत्रात मुबलक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी व कारखाना यांच्यादृष्टीने गळीत हंगाम नक्कीच समाधानकारक असेल. सभासदांना नेहमीप्रमाणे योग्य व वेळेत दर देण्याबाबतची परंपरा अखंडितपणे राबविली जाईल. सभासदांनी ऊस देऊन कारखान्याला सहकार्य करावे.
यावेळी उमादेवी जाधव, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब सरवळे, श्रीधर माने, अंकुश आवताडे, प्रमोद आवताडे, ज्ञानेश्वर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
प्रारंभी संचालक राहुल जाधव व प्रियांका जाधव व वांगी (ता. द. सोलापूर) येथील सभासद बनसिद्ध जवळकोटे व शांताबाई जवळकोटे या दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखाना बॉयलरचा अग्निप्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. यासाठी दोनशे ट्रॅक्टर, तीनशे बैलगाडी, दीडशे डंपिंग ट्रॅक्टर यांच्याशी करार करण्यात आले असल्याचे कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले.
यावेळी चंद्रकांत सरवळे, भानुदास गावडे, नामदेव गायकवाड, रफिक पाटील, प्रभाकर पाटील, सिद्धेश्वर मोरे, दीपक माने, बसवेश्वर पुजारी, रघुनाथ होनराव, समाधान महाडकर, अण्णासाहेब पाटील, ब्रह्मदेव पुजारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन देविदास नाईकनवरे यांनी केले.