‘जरंडेश्वर’ची फसवणूक; मुकादमास पोलिस कोठडी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : जरंडेश्वर शुगर मिल्स साखर कारखान्याची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी एका मुकादमास अटक करून न्यायालयात दाखल केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश  देण्यात आला आहे. हणमंत नामदेव आजबे, (रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड) असे या मुकादमाचे नाव आहे. एकूण १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी १६ एप्रिल रोजी कोरेगांव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कोरेगाव पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, जरंडेश्वर शुगर मिल्स या खासगी साखर कारखान्यास हणमंत नामदेव आजबे याच्यासह सात जणांनी ऊस वाहतूक व ऊस तोडणीसाठी वाहने व मजूर पुरवण्याबाबत करार करून कारखान्याचा विश्वास संपादन केला होता. प्रत्यक्षात ठरलेल्या करारानुसार वाहने व मजूर न पुरवठा करता अन्य व्यक्तींशी संगनमत करून कारखान्यास वाहनांचे खोटे क्रमांक देऊन करार केलेली वाहने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अन्य कारखान्यास लावली. आजबे याने कारखान्याची सहा लाख ९९ हजार ८७ रुपयांची फसवणूक केली. त्याचबरोबर प्रत्यक्षात २४ टोळ्यांचे भाडे घेणे अपेक्षित असताना त्याने ४२ टोळ्यांचे भाडे घेऊन आठ लाख ६७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सन २०२० ते २०२४ या चार वर्षांमध्ये काळात घडला आहे.

याप्रकरणी कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार हणमंत नामदेव आजबे, दिनकर नामदेव आजबे, नामदेव शामराव आजबे, रविकांत झुंबर अडागळे, प्रकाश अंबादास लवांदे, विशाल अंकुश आजबे, बाबासाहेब राजाराम भंवर यांनी आपापसात संगनमत करून एकूण १५ लाख ६६ हजार ८७ रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »