‘जरंडेश्वर’ची फसवणूक; तिघांविरोधात गुन्हा दाखल

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सातारा : उसाचे खोटे वजन दाखवून कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्सची १ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.  याप्रकरणी संदीप सावंत कोरेगाव पोलीस ठाण्यात यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार वजनकाटा कारकुनासह त्याचा साथीदार आणि एका ट्रॅक्टर मालकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दर्शन प्रताप शेडगे (रा. चिमणगाव) रोहन विजय पवार (रा. वाघजाईवाडी) आणि सतीश नारायण चव्हाण (रा. एकंबे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, पोलिस तपासादरम्यान संबंधित आरोपींनी फसवणू केल्याचे कबुल केले आहे.

२६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबरदरम्यान शेडगे याने नियोजनपूर्वक खोटे वजन दाखवले. जड वजनाची ट्रॉली घेतल्यावर ड्रायव्हर निघताच, शेडगे हा मित्र रोहन पवार याच्या ट्रॅक्टरचा टायर नंबर कॉम्प्युटरमध्ये मॅन्युअली टाकत असे. त्यामुळे प्रत्यक्षात वजनकाट्यावर न आलेल्या ट्रॉलीला आधीच्या जादा वजनाची नोंद लावली जात होती. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसून आला आहे. चौकशीत शेडगे आणि पवार यांनी तोंडी व लेखी कबुली दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या पद्धतीने पाच ट्रॅक्टर ट्रॉलींमध्ये प्रत्येकी सहा टन असे एकूण ३० टन खोटे वजन दाखवून कारखान्याची आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »