‘जरंडेश्वर’ कारखान्याची डिस्टिलरी बंद
सातारा : कोरेगाव जवळील जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आणि लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनी प्रा. लि. यांचा संयुक्त करार संपुष्टात आल्याने डिस्टलरी बंद ठेवण्यात यावी, असा लेखी आदेश पुणे येथील प्रादेशिक साखर सहसंचालकांनी बजावल्याने व्यवस्थापनाने डिस्टिलरी बंद करण्याचे मान्य करून उत्पादन थांबवले आहे.
त्यामुळे सलग १९ वर्षे कारखाना सभासदांच्या मालकीची डिस्टलरी शासनाने लेखी आदेशाने ताब्यात घेतली.
सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांनी नंतर जरंडेश्वरच्या डिस्टिलरीसंदर्भात पुणे येथील कार्यालयात बैठक आयोजित केली होती. बैठकीला साखर सहसंचालक संजय गोंदे, अवसायक प्रीती काळे आदी अधिकारी उपस्थित होते.
डिस्टलरीसंबंधित अनेक कायदेशीर लढाया सुरु असून डिस्टलरीच्या जागेसंदर्भातही खटले विविध न्यायालयात सुरू आहेत. सहकार आयुक्त शेखर गायकवाड यांच्या आदेशान्वये योग्यवेळी पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती कोरेगाव सहकार विभागाच्या उपनिबंधक प्रीती काळे यांनी दिली.
आजअखेर या डिस्टलिरीतून इथेनॉलचे उत्पादन नियमितपणे सुरू होते. या डिस्टलरीच्या जागेसंबंधित तक्रारी गुरु कमोडिटीज, लक्ष्मी ऑरगॅनिक आणि जरंडेश्वर व्यवस्थापन यांच्यावतीने विविध न्यायालयामध्ये दाखल झालेल्या आहेत, त्यांचा निकाल अद्याप लागलेला नाही.
दरम्यान कराराची मुदत संपुष्टात आल्याने अवसायक सहकार उपनिबंधक प्रीती काळे यांनी साखर सहसंचनालयाच्या आदेशाने कार्यस्थळावर जाऊन डिस्टलरीचा कागदापत्री ताबा घेतला.
पुढील कारवाई जागेसंबंधीच्या न्यायालयीन खटल्याच्या निपटाऱ्यानंतर योग्य ती कारवाई साखर आयुक्तांच्या आदेशाने करण्यात येईल, अशी माहिती काळे यांनी दिली.