कोणाच्या कानशिलात मारण्याची भाषा करता : आ. आवाडेंचा शेट्टींना प्रतिइशारा

93 वर्षांचे कल्लाप्पाण्णा म्हणाले, ‘अभी भी मैं जवान हूँ’
कोल्हापूर : शेतकऱ्यांना प्रतिटन ४०० रुपये मिळालेच पाहिजेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास आमचाही पाठिंबा आहे. पण संघटनेच्या नेत्यांनी सभेत बोलताना आपल्या तोंडाला जरा लगाम घालावा आणि सांभाळून बोलावे, असा सल्ला जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत आ. प्रकाश आवाडे यांनी ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना दिला.
तुम्ही कुणाच्या कानशिलात मारण्याची भाषा करताय? आपल्यात आहे का ती हिंमत? दादांच्या थोबाडीत मारणारा या सभेतून बाहेरसुद्धा जाणार नाही, याची जाणीव संघटनेच्या नेत्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवावी, असा सज्जड दम आमदार आवाडे यांनी सभेत उपस्थित असणाऱ्या सावकर मादनाईक, अण्णासाहेब चौगुले यांच्यासह संघटनेच्या नेत्यांना भरला. गतवर्षी तुटलेल्या उसाच्या दरापोटी चारशे रुपयांचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांना नाही मिळाल्यास चेअरमन, पदाधिकाऱ्यांच्या कानशिलात मारू, असा इशारा स्वाभिमानी शतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला होता. त्या विधानाचा आ. आवाडे यांनी सभेत जोरदार समाचार घेतला.
हुपरी (ता. हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रकाश आवाडे यांनी संबोधित केले. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, राहुल आवाडे, उत्तम आवाडे आदी उपस्थित होते.
आवाडे म्हणाले, आमदार शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्यासाठी व त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठीच संस्थापक आवाडे दादांनी काम केले आहे. जवाहरची उभारणी होताच अगदी पहिल्या हंगामापासूनच आम्ही चार अंकी दर देत आलो आहोत. त्यावेळी शेतकरी संघटनेचा जन्मही झाला नव्हता. संघटनेच्या नेत्यांनी याचा कुठे तरी अभ्यास करून सभेत बोलण्याची गरज आहे.
९३ वर्षांचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कारखान्याने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या योगदानाची माहिती यावेळी दिली. दादांनी पण ‘अभी भी में जवान हूँ’ असा असा शेर मारल्याने सभेत हास्यकल्लोळ उडाला.
स्वप्निल आवाडे, सुरज बेडगे किशोरी आवाडे, अण्णासाहेब गोटखिंडे, आदगौडा पाटील, शेखर पाटील, शिवराज नाईक, अण्णासाहेब भोजे, सुधाकर मणेरे, सुजितसिंह मोहिते, प्रकाश दत्तवाडे आदी उपस्थित होते. उपाध्यक्ष बाबासाहेब चौगुले यांनी आभार मानले.