साखर कामगारांना चांगले पगार द्या – जयंत पाटील
![Jayant Patil](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/10/jayant-patil-profile-copy.jpg?fit=768%2C471&ssl=1)
कोल्हापूर : सहकारातील कुशल अधिकारी व कामगारांना चढा पगार देऊन खासगी साखर कारखानदार स्वत:कडे खेचत आहेत. साखर कामगारांना मर्यादित पगार देत असल्याने सहकारी साखर उद्योगांकडे तरुण वळत नाहीत. त्यामुळे शहरी उद्योगांच्या बरोबरीने शक्य नसले, तरी किमान ग्रामीण उद्योगाचे तुलनेत चांगले पगार द्यावे लागतील, असा सल्ला माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी दिला.
![Jayant Patil Speaking](https://i0.wp.com/sugartoday.in/wp-content/uploads/2023/10/jayant-patil-speaking-copy.jpg?resize=1024%2C436&ssl=1)
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा येथील गिरीस्थान नगरपरिषद सभागृहात महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळआयोजित तीन दिवशीय कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचा शुभारंभ शनिवारी (दि.७ ऑक्टोबर) सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांचे हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील, माळेगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, रत्नाप्पाणा कुंभार पंचगंगा कारखान्याचे अध्यक्ष पी.एम.पाटील, प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कार्याध्यक्ष राऊसाहेब पाटील, अविनाश आपटे, उपाध्यक्ष युवराज रणवरे,अशोक बिराजदार, नितीन बेनकर, प्रदीप शिंदे, सरचिटणीस शंकरराव भोसले, सचिव राजेंद्र तावरे, संजय मोरबाळे, योगेश हंबीर, कोषाध्यक्ष प्रदीप बनगे, सवाजी कदम, संजय पाटील, ज्ञानदेव आहेर, रवी तांबे आदी व्यासपीठावर होते.
श्री. पाटील पुढे म्हणाले की,अलीकडच्या काळात खासगी कारखान्यांची संख्या वाढली आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरल्यामुळे खासगी कारखान्यात कमी कामगार असतात. खासगी कारखान्यात बसलेला त्याच्या फायद्यासाठी काम करत असतो, तर सहकारी कारखान्यात बसलेला संचालक मंडळाचा प्रमुख आणि संचालक मंडळ हे आपल्या भागाच्या हितासाठी काम करत असतात.
कामगार कायदे शोषण करणारे
कुशल कामगार ठेकेदारी पद्धतीने नेमण्याची नवीन पद्धत सुरु झाली आहे. देशात परदेशी गुंतवणूक यावी यासाठी भारतीय कामगार कायद्यात शिथिलता आणून कामगारांचे अधिकार कमी करणारे व शोषण करणारे कायदे आणले जात आहेत, अशा कामगार कायद्याने विरोधात कोणीच रस्त्यावर येताना दिसत नाही. साखर कामगारांच्या 12% वेतन वाढीची अंमलबजावणी करण्यास अनेक कारखाने टाळाटाळ करताना दिसत आहे. मार्च मध्ये कराराची मुदत संपत असल्याने मागील कराराची अंमलबजावणी केली पाहिजे. यासाठी साखर संघाने यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. साखर कामगारांचे प्रश्न सोडवून कामगारांचे हिताची काळजी घेतली पाहिजे, असे जयंत पाटील म्हणाले.
साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील म्हणाले, कारखाना व्यवस्थापन व कामगार यांनी व्यवसायिक दृष्टिकोन ठेवून व्यवस्थापन करावे. साखर कारखानदारीतील कामगारांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राज्य साखर संघ, साखर आयुक्तालय व राष्ट्रीय साखर संघ मिळून पंधरा दिवसांमध्ये बैठक घेऊ. कारखाने बंद पडणे हे व्यवस्थापनाचे पाप आहे कामगारांचे नाही असेही स्पष्टवक्ती त्यांनी दिली.
प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे म्हणाले,साखर कारखान्यात नव्याने आलेल्या कामगारांच्या प्रश्नांची जाण नाही, जिथे संघटना व व्यवस्थापन हातात हात घालून आहेत तेच कारखाने व्यवस्थित सुरू आहेत. कामगार कायद्यात बदल करून गुलामगिरी आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. अनेक साखर कारखान्यांनी 12% वेतन वाढ लागू केलेली नाही.
या तीन दिवसीय निवासी शिबिरात राज्यातील कामगार संघटनाचे सुमारे सहाशहून अधिक कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत. उपाध्यक्ष युवराज रणवरे यांनी आभार मानले.