‘बिद्री’त के. पीं.च्या सत्ताधारी आघाडीचा दणदणीत विजय

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ,आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार के पी पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री महालक्ष्मी शेतकरी आघाडीने यांनी विरोधी परिवर्तन पॅनलचा फडशा पाडत कागल तालुक्यातील बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्यांवर आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. सर्व २५ जागांवर सत्ताधारी पॅनलचे उमेदवार मोठ्या मतांनी विजयी झाले.
गेल्या महिन्याभरापासून राधानगरी, भुदरगड, कागल, करवीर या चार तालुक्यातील २१८ गावांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या आणि सर्वाधिक सभासद असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले होते. चार तालुक्यातील या निवडणुकीला मिनी विधानसभा म्हणून पाहिले जात असल्याने कधी नव्हे ते यंदा ही निवडणूक जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांना प्रतिष्ठेची झाली होती.
विरोधी गटात असलेल्या ए. वाय. पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार प्रचार करत निवडणूक अत्यंत चुरशीची केली. मात्र मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी देखील या निवडणुकीत उतरत, आमदार प्रकाश आबिटकर आणि ए वाय पाटील यांच्या परिवर्तन आघाडीला पराभूत करत, पुन्हा एकदा आपली सत्ता आणली आहे.
निवडणुकीत प्रामुख्याने हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील या आजी-माजी पालकमंत्र्यामध्ये प्रतिष्ठेची लढत झाली होती. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीत आमदार सतेज पाटील, के. पी. पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांच्यासह पाच माजी आमदारांचा समावेश होता.
मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणी दरम्यान परिवर्तन आघाडीचे नेते ए वाय पाटील यांनी मतमोजणी केंद्रात हजेरी लावून परिस्थिती पाहत होते. मात्र प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सत्ताधारी के पी पाटील यांच्या बाजूने कौल दिसू लागल्यानंतर ए वाय पाटील यांनी मतमोजणी केंद्रावरून काढता पाय घेतला. सत्ताधारी के. पी. पाटील गटाला पहिल्या फेरीत सरासरी ४५९९ आघाडी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला तर याचवेळी बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील मतमोजणी स्थळावर दाखल होताच कार्यकर्त्यांनी त्यांना गुलाल लावत जल्लोष सुरू केला. यावेळी बोलताना के पी पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला असून विरोधकांनी केलेला दावा हा अतिशय चुकीचा होता.
विरोधकांनी अतिशय गलिच्छ अपप्रचार करत होते. कारखान्याच्या भूमिकेत अडथळा आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. शिवाय पैशाच्या जीवावर मतदारांना अनेक अमिषा दाखवण्यात आली. मात्र जनता आणि सभासद आमच्यासोबत होते. यामुळे मतदार सभासद हा चिडून उठला आणि ए वाय पाटील यांना उत्तर दिले, असे के पी पाटील म्हणाले आहेत.
पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये राडा
मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती जसे निकाल हाती लागतील तसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत होता. दुपारनंतर ही गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली. अशातच काही अति उत्साही कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रात जाण्यासाठी पोलिसांबरोबर बाचाबाची सुरू केली. या बाचाबाची चे रूपांतर राडा मध्ये झाला. कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात बॅरिकेड तोडून आज जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत या अति उत्साही कार्यकर्त्यांना बाहेर काढले. यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
\\\
प्रमुख पराभूत
विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय मंडलिक ,खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर, समरजितसिंह घाटगे आदींनी केले होते. तर सत्ताधारी आघाडीला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी विरोधी छावणीत जाणे पसंत केले होते. मात्र ए. वाय. पाटील यांच्यासह आमदार आबिटकर यांचे भाऊ अर्जुन आबिटकर, गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष विठ्ठलराव खराटे, संचालक बाबासाहेब पाटील, माजी संचालक के. जी. नांदेकर आदी प्रमुखांना पराभवास सामोरे जावे लागले.
‘लई भारी’ सत्तेत
बिद्रीच्या सत्ताकाळात आणि प्रचारात के. पी. पाटील यांनी ‘लई भारी कारभार’ असे घोषवाक्य बनवले होते. त्याला सभासदांनी प्रतिसाद देत पाटील यांच्यासह सर्व संचालकांनी सरासरी ७ हजाराच्या मताधिक्याने विजयी केले.






