कर्नाटक : साखर उत्पादनात मोठी वाढ

८१ कारखान्यांचे गाळप पूर्णत्वाकडे
बेळगाव: कर्नाटक राज्यातील चालू ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीअखेर ८१ कारखान्यांनी ५५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४७.३५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. ४७ कारखान्यांनी गाळप पूर्ण केले असून ३४ कारखाने अजूनही सुरू आहेत. मार्चअखेरपर्यंत उत्पादनाचा आकडा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ऊस गाळपात बेळगाव (२९ कारखाने) प्रथम क्रमांकावर असून त्यापाठोपाठ बागलकोट आणि विजापूर जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. राज्यातील ३७ कारखान्यांनी सुमारे १० लाख मेट्रिक टन उसाचा वापर थेट इथेनॉल निर्मितीसाठी केला आहे. बैलहोंगल येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १२.२४% साखर उतारा नोंदवून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.
कारखान्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत १५८४ कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले असून, ५१०.६० कोटी रुपयांची देणी अद्याप प्रलंबित आहेत. मुबलक पाऊस आणि ऊस लागवड क्षेत्रात झालेली वाढ ही या विक्रमी उत्पादनाची मुख्य कारणे मानली जात आहेत.






