काटामारी मान्य; मग कारवाई का नाही ?

राजू शेट्टी यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
कोल्हापूर : काटामारीचे अस्तित्व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मान्य केले. मग त्यांनी संबंधित कारखान्यांवर कारवाई का केली नाही, असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद १६ ऑक्टोवर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहे. या परिषदेच्या तयारीसाठी आयोजित बैठकीदरम्यान ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले की, आम्ही वारंवार राज्य सरकारला काही साखर कारखाने काटामारी करून रिकव्हरी चोरी करत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते; पण सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्तांना मदत म्हणून ऊस विलातून प्रति टन १५ रुपये कपात करण्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर मी आवाज उठविल्यानंतर त्यांनीच साखर कारखाने काटामारी करत असल्याचे सांगितले आहे.
संघटनेने सरकारला चारी मुंड्या चित केले
एकरकमी एफआरपी मिळावी म्हणून उसाला आम्ही न्यायालयात लढा दिला. हा लढा केवळ कायदेशीर नव्हे, तर शेतकऱ्यांच्या सन्मानाचा होता. सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले तरी त्यांचे अपील फेटाळले गेले. म्हणजेच या न्यायालयीन रणभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला चारी मुंड्या चित केल्याचे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले.