‘केदारेश्वर’च्या अध्यक्षपदी ऋषिकेश ढाकणे, उपाध्यक्षपदी काटे
अहिल्यादेवीनगर : संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी ऋषिकेश प्रतापराव ढाकणे यांची, तर उपाध्यक्षपदी माधवराव भिवसेन काटे यांची बिनविरोध निवड झाली.
केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मागील महिन्यात बिनविरोध झाली. कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी नवीन संचालक मंडळाची बैठक झाली.
अध्यक्षपदासाठी ऋषिकेश ढाकणे यांच्या नावाची सूचना संचालक पांडुरंग काकडे यांनी मांडली. त्यास शिवाजी जाधव यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठी माधव काटे यांच्या नावाची सूचना सदाशिव दराडे यांनी मांडली. त्यास ऋषिकेश ढाकणे यांनी अनुमोदन दिले. दोघांचेच अर्ज असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पी. एच. लोखंडे, सहाय्यक अधिकारी बी. बी. सोनवणे, आवारे, विखे यांनी ढाकणे व काटे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली.
यावेळी अध्यक्ष ऋषिकेश ढाकणे म्हणाले, केदारेश्वर हा ऊसतोडणी मजूर सभासदांचा साखर कारखाना आहे. त्यामुळे इथे कोणताही निर्णय घेताना सामान्य सभासदांना डोळ्यापुढे घेऊन संस्था व त्यांच्या हिताचे निर्णय निश्चितपणे घेईल. सभासदांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही.
ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री कारखान्याचे संस्थापक बबनराव ढाकणे यांनी अतिशय कष्टातून या कारखान्याची उभारणी केलेली आहे. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करीत अॅड. प्रतापराव ढाकणे यांनी कारखान्याला उर्जितावस्था निर्माण करून दिली. त्यांनी कारखान्याच्या व सभासदांच्या हितासाठी अक्षरशः रक्ताचे पाणी केले आणि कारखाना विकू दिला नाही. मीदेखील शेवटच्या श्वासापर्यंत कारखान्याच्या हितासाठी काम करत राहीन, अशी ग्वाहीही अध्यक्ष ढाकणे यांनी दिली.
यावेळी माजी अध्यक्ष व संचालक प्रतापराव ढाकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विन कुमार घोळवे, प्रभारी कार्यकारी संचालक रमेश गर्जे , प्रशासकीय अधिकारी पोपट केदार , यांच्यासह सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी व समर्थक उपस्थित होते सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केली तर आभार संचालक तुषार वैद्य यांनी मानले.