भोजन तुमच्या पोटात, तर प्लेट प्राण्यांच्या पोटात….
यंदा एक सिनेमा आला होता, ‘केरळ स्टोरी’ नावाचा… त्याची कथा दहशतवादावर आधारलेली होती. ही पण ‘केरळ स्टोरी’च आहे. पण बगॅसवर आधारलेली ही सत्यकथा आहे ‘कुदरत’ची –
- नयनी पोतदार यांच्या लेखणीतून
तीनेक दशकांपूर्वी प्लॅस्टिकचे प्रचंड कोड-कौतुक होत असे. त्याच्या रूपाने ‘जादूची कांडी’च हाती लागली आहे, अशा तोर्यात लोक वावरत होते. त्याने हळुहळू रंग दाखवायला सुरूवात केली. मात्र त्याचे भयानक परिणाम लक्षात येण्यासाठी मोठा कालावधी जावा लागला. प्लॅस्टिकचे गुणगान गाणारे, आता त्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत, हा चांगलाच बदल आहे. काही लोकांनी वेगळी वाट स्वीकारून प्लॅस्टिकला पर्याय शोधण्यासाठी संशोधन सुरू केले. त्यात अनेकांना यश आले.. अशाच वेगळ्या वाटेवर चालणार्या दोन बंधूंची ही कहाणी आहे..
जगाच्या इतर भागात रोजगार आणि व्यवसायाच्या संधी शोधण्यासाठी मल्याळी तरुणांचे स्थलांतर नित्याचा भाग आहे. मात्र उत्तर प्रदेशातील दोन तरुण भावांनी केरळमध्ये स्थलांतर केले आणि राज्यात एक आशादायक ’ग्रीन’ व्यवसाय सुरू केला आहे. ऋषभ सुरी आणि त्यांचा भाऊ रोहन सुरी यांनी 2020 मध्ये तिरुवनंतपुरममध्ये डिस्पोजेबल टेबलवेअर बनवणार्या ‘कुदरत’ या स्टार्टअपची स्थापना केली. आधी ते मोटारसायकलच्या डीलरशिपमध्ये होते. हा व्यवसाय करता करता त्यांनी कचरा व्यवस्थापनातून निर्माण होणार्या व्यवसायाच्या संधी शोधल्या आणि त्यावर काम सुरू केले.
ऋषभने तिरुवनंतपुरममध्ये स्टार्टअप सुरू केले. त्याला त्याच्या उत्पादनांच्या संशोधन आणि विकासासाठी उडखठ अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर इंटर डिसिप्लिनरी सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे तांत्रिक पाठबळ हवे होते.
‘कुदरत’ आता तांदळाच्या तुसापासून आणि वरील आवरणापासून निघालेल्या भुसापासून प्लेट्स, कप आणि मग बनवते, तर नारळाच्या पानांपासून वाट्या बनवते. गव्हाच्या आणि तांदळाच्या पिठापासून चमचे बनवले जातात.
कुदरत कंपनी आता बाऊल आणि बशा, तसेच डिनर आणि स्नॅक प्लेट्स आणि विविध कप्पे असलेल्या ’कॅन्टीन’ प्लेट्सदेखील बनवते. एकदा वापरल्यानंतर, ‘कुदरत’ची ही उत्पादने जैव खते किंवा प्राण्यांसाठी अन्न म्हणून वापरली जाऊ शकतात. ऋषभच्या मित्राचा उत्तर प्रदेशात खासगी साखर कारखाना आहे. त्याने एकदा या साखर कारखान्याला भेट दिली तेव्हा शेतीतील कचरा आणि अवशेषांपासून बनवलेल्या टेबलवेअरची कल्पना त्याला सुचली. उसाच्या बगॅसपासून देखील टेबलवेअर बनवता येऊ शकतात हे त्याच्या लक्षात आले.
ऋषभने डिसेंबर 2020 मध्ये उडखठ सोबत करार केला आणि त्यानंतर पुढील दीड वर्ष संशोधन चालू राहिले. पथदर्शी उत्पादन ऑगस्ट 2022 मध्ये लाँच करण्यात आले आणि त्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत विक्री अल्प प्रमाणात सुरू झाली. कंपनीने एप्रिल 2023 पर्यंत आपल्या उत्पादनांमध्ये विविधता आणण्यास सुरुवात केली आणि उत्पादनासाठी समविचारी कंपन्यांसोबत भागीदारी करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला आमचा विश्वास होता की प्रत्येक गोष्ट स्वतःच बनवायची, पण जेव्हा आम्हाला समजले की आमच्याकडे मर्यादित संसाधने आणि वेळ आहे तेव्हा आम्ही भागीदारी निवडली. आम्ही तांदळाच्या भुसापासून आणि तांदळाच्या पेंढ्यापासूनची उत्पादने तिरुअनंतपुरममध्ये बनवतो. तर नैसर्गिक तंतू, नारळाची पाने यापासूनची उत्पादने बेंगळुरूजवळ तयार होत आहेत. बगॅसपासूनची उत्पादने मुख्यतः गुजरातमध्ये बनवत आहोत. आमची नैसर्गिक फायबर कटलरी देखील गुजरातमधून येते, असे ऋषभ म्हणाला.
कंपनीने आतापर्यंत 64 लाख रुपयांचे अनुदान मिळवले आहे. यामध्ये स्टार्टअप इंडिया, केरळ स्टार्टअप मिशन आणि अर्नेस्ट अँड यंग यांच्याकडून आर्थिक मदतीचा समावेश आहे. या आर्थिक वर्षात कंपनी जवळपास 75 लाख रुपयांच्या उलाढालीवर बंद होत आहे. त्याची सर्वाधिक विक्री इ2इ क्षेत्रात होते.
व्यवसाय सुरू करण्यासाठी यूपीहून केरळला जाण्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता, ऋषभ म्हणाला, की प्रत्येक ठिकाणाचे स्वतःचे गुण आणि तोटे आहेत आणि व्यवसायांच्या वाढीसाठी आव्हानांवर मात करणे अपरिहार्य आहे.
ऋषभ सांगतो की, मी जेवणावर ताव मारतो आणि नंतर मी जी प्लेट वापरली त्यावर माझे कुत्रे ताव मारते. म्हणजे काहीही वाया जात नाही आणि समजा प्लेट कुणी खाल्ले नाही तर त्याचे सहज विघटन होते. जे प्लॅस्टिक प्लेटबाबत कधीच शक्य नाही.
प्लॅस्टिकचा आम्हालाही त्रास झालेला आहे. मला सर्फिंगची आवड आहे. आम्ही जेव्हा समुद्रात सराव करत असू, तेव्हा अनेकदा कागद किंवा प्लास्टिकचा कप माझ्या डोक्यावर आदळत असे आणि कधी कधी प्लास्टिकची पिशवी पायाभोवती गुंडाळली जायची. समुद्राच्या पाण्यात असा कचरा मोठ्या प्रमाणावर असतो, ऋषभ म्हणतो.
अशाच आणखी एका घटनेची आठवण करून देताना तो म्हणतो, 2018 मध्ये, मी आणि माझा भाऊ युगांडाच्या पर्वतरांगांमध्ये गोरिला शोधण्यासाठी ट्रेक करत होतो, तेव्हा आम्हाला तिथेही प्लास्टिक दिसले! आमच्या लक्षात आले की अगदी दुर्गम ठिकाणीही प्लॅस्टिक आहे. तेव्हापासून, पर्यावरणाच्या समस्येचे निराकरण करणार्या उपायांवर काम करण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला.’’
‘कुदरत’च्या उत्पादनांना केवळ दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईसारख्या भारतीय महानगरांमध्येच नाही, तर अंदमान आणि निकोबार बेटे आणि मिझोराम आणि नागालँड या ईशान्येकडील राज्यांमध्येही ग्राहक मिळाले आहेत. भारता व्यतिरिक्त, या भावंडांचे अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि मेक्सिकोमध्येही खरेदीदार आहेत.
शेतीतील कचर्यापासून ही उत्पादने कशी तयार केली जातात हे सांगताना ते म्हणतात, प्रथम, आम्ही तिरुअनंतपूरममधील गिरण्यांमधून भुसा आणि तांदळाचे धान्य आणि शेतकर्यांकडून कोंडा गोळा करतो. नंतर त्यावर प्रक्रिया करून उत्पादने बनवतो. आमच्या उत्पादनांचे शेल्फ लाइफ एक वर्षापेक्षा जास्त आहे. तसेच ही उत्पादने तुमच्या कामासाठी वापरून झाल्यानंतर खत म्हणूनही वापरली जाऊ शकतात, कारण त्यात पाणी टिकवून ठेवण्याची गुणवत्ता आहे.
100 टक्के बायोडिग्रेडेबल (विघटन होणारी) असण्या व्यतिरिक्त, आमची उत्पादने कोणत्याही प्राण्यासाठी देखील खाण्यास सुरक्षित आहेत, असा ऋषभचा दावा आहे.
ऋषभ आणि रोहन सांगतात की, आमच्या या ग्रीन व्यवसायाने रोज 4,000 किलो कृषी-कचरा जाळण्यापासून रोखला आहे, तर 2,880 किलो सिंगल-यूज प्लास्टिक लँडफिल आणि समुद्रात जाण्यापासून वाचवले आहे.