भीमाशंकर कारखान्याचे इंजिनिअर हुले यांचा अपघातात मृत्यू

मंचर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील इलेक्ट्रिकल इंजिनिअर किशोर बाबाजी हुले (वय 32 वर्षे) यांचे अपघाती निधन झाले, तर त्यांचा लहान मुलगा जखमी झाला आहे. ऐन तरुण वयात हुले यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
श्री. किशोर हुले हे आपल्या दीड वर्षाच्या मुलासह २७ फेब्रुवारी रोजी मोटारसायकलवरून मंचरच्या दिशेने येत असताना लांडेवाडी जवळील पेट्रोल पंपाच्या जवळ त्यांना एका पिकअप गाडीने जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की त्यात किशोर हुले यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा दीड वर्षाचा मुलगा किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
किशोर हुले हे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत होते. ते अत्यंत प्रामाणिक व हुशार होते. त्यांनी त्यांच्या कामात अल्पावधीतच प्रगती केली होती.
किशोर हुले यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी व दीड वर्षाचा मुलगा आहे. त्यांच्या या जाण्याने भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यातील सर्व कर्मचारी, अधिकारी, कार्यकारी संचालक श्री. चंद्रकात ढगे यांनी ती्र दुःख व्यक्त केले आहे.
किशोर हुले यांच्या अंत्यविधीसाठी नारोडी पिंगळवाडीतील ग्रामस्थ, नातेवाईक व भीमाशंकर साखर कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






