कोल्हापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अभिनव स्पर्धा

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ऊस पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान अंतर्गत ‘शाश्वत ऊस उत्पादन वाढ अभियान’ राबविण्यात येत असून, याचाच एक भाग म्हणून ‘ऊस पीक उत्पादकता वाढ स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्ह्याची सध्याची ९६ टन प्रति हेक्टर ऊस उत्पादकता वाढवून ती १२५ टन प्रति हेक्टरपेक्षा अधिक नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या स्पर्धेचे आयोजन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कोल्हापूर आणि जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्यामार्फत केले जात आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री. प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा राबविण्यात येत आहे.
सहभागाचे निकष:
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही महत्त्वाचे निकष ठरवण्यात आले आहेत:
- शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे आणि त्यांनी स्वतः ऊस लागवड केलेली असावी.
- किमान ४० गुंठे (एक एकर) सलग क्षेत्रावर ऊस लागवड असणे बंधनकारक आहे.
- अर्ज केलेले सर्व शेतकरी स्पर्धेसाठी पात्र असतील.
- ही स्पर्धा जिल्हा तसेच तालुका स्तरावर आयोजित केली जाईल.
- पीक कापणी करणे अनिवार्य आहे.
- या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही.
शेतकऱ्यांना मिळणारे लाभ:
या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या तसेच सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध लाभ दिले जातील:
- उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्रक आणि आर्थिक बक्षीस प्रदान करण्यात येईल.
- ऊस क्षेत्रातील प्रमाणित प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळेल.
- अभ्यास दौऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल.
- कृषि विभाग, कृषि विज्ञान केंद्र आणि कृषि विद्यापीठांच्या मार्फत नवीन तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन केले जाईल.
अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे:
या स्पर्धेसाठी अर्ज करण्यासाठी मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:
- विहित नमुन्यातील अर्ज
- ७/१२ आणि ८ अ उतारा
- स्पर्धेसाठी निवडलेल्या क्षेत्राचा नकाशा
अधिक माहितीसाठी, ग्राम स्तरावरील सहाय्यक कृषि अधिकारी / उप कृषि अधिकारी / तालुका कृषि अधिकारी तसेच जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयांशी संपर्क साधता येईल. तसेच, dsaokolhapur@gmail.com या ईमेल आयडीवर माहिती भरून अर्ज सादर करता येईल.
या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट “शाश्वत समृद्धीचा एकच ध्यास, ऊस उत्पादकता वाढीकावे शेतकऱ्यांचा विकास!!!” हे आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या कृषि विकासात हे एक महत्त्वाचे पाऊल ठरेल अशी अपेक्षा आहे.