कृषीनाथच्या संचालकांचे विश्वस्तांच्या भावनेतून काम : पवार
अहिल्यानगर : पारनेरसारख्या दुष्काळी तालुक्यात साखर कारखाना उभारण्याचे मोठे धाडस कृषीनाथच्या संचालकांनी दाखवले आणि त्यांच्या या धाडसाता ऊस उत्पादकांनी प्रतिसाद दिला, यातच या कारखान्याचे यश आहे. खासगी साखर कारखाना असूनही हा कारखाना पारनेरसह राहुरी, नगर, नेवासा, श्रीगोंदा, शिरुर, संगमनेर या तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्याच वर्षात आपला कारखाना वाटू लागला. कृषीनाथच्या संचालकांनी विश्वस्ताच्या भावनेतून केलेल्या कामाची हीच पोहोच पावती असून शेतक-यांच्या विश्वासाला या संचालकांकडून तडा जाणार नाही, असा विश्वास पोपटराव पवार यांनी व्यक्त केला.
कृषीनाथ ग्रीन एनर्जी लि. माळकुप (बवळपुरी फाटा) ता. पारनेर येथील साखर कारखान्याचा बॉयलर अग्रीप्रदीपन आणि गव्हाण पूजन कार्यक्रम नगरचे खासदार निलेश लंके आणि पोपटराव पवार यांच्या हस्ते नुकताच पार पडला. यावेळी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीनाथ म्हस्कोवा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. पांडुरंग राऊत आणि प्रमुख पाहुणे म्हणून जनता सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश कश्यप, राज्य सहकारी बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक अशोक माने, कल्याण जनता सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक अनंत कुलकर्णी, कॉसमॉस बँकेच्या सरव्यवस्थापक अपेक्षिता ठिपसे, माळकुपचे सरपंच संजय काळे, उपसरपंच राहुल घंगाळे, ढवळपुरीचे सरपंच सौ. नंदाताई भागाजी गावडे, कृषीनाथचे कार्यकारी संचालक व अध्यक्ष महेश करपे, कार्याध्यक्ष रविंद्र भुजबळ, उपाध्यक्ष अनिल मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश मते, संचालक भाऊसाहेब आव्हाळे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील ऊस उत्पादक, सरपंच, सेवा सोसायट्यांचे चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोपटराव पवार म्हणाले की, माळकुप ढवळपुरी परिसरातील माळरानावर साखर कारखाना उभा राहत असताना तो यशस्वीपणे चालेल किंवा नाही याबाबत अनेकांना शंका होत्या. मात्र, कृषीनाथच्या संचालक मंडळाने प्रतिकुल परिस्थितीवर मात करत हा खासगी कारखाना चालवून दाखवला. मागील वर्षात चाचणी गळीत हंगाम यशस्वी केला. सहवीजनिर्मिती आणि इथेनॉल निर्मितीचे मोठे धाडसी पाऊल संचालकांनी उचलले आणि त्यात त्यांना यशही आले.
कार्यकारी संचालक महेश करपे यांनी कारखाना उभारणीपासून ते आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला. ऊस उत्पादकांना न्याय देण्याच्या भूमिकेतून कारखाना चालवताना काळजी घेतली जात असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
तेव्हा आमदार, आता खासदार : लंके
कृषीनाथ साखर कारखान्याचा पहिला चाचणी गळीत हंगाम सुरु करताना गव्हाणीत मोळी टाकण्यासाठी आलो त्यावेळी मी आमदार होतो आणि आता दुसऱ्यांदा गव्हाण पूजन करताना आलो असताना खासदार म्हणून येण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल खासदार नीलेश लंके यांनी समाधान व्यक्त केले. राज्यातील साखर कारखानदारांच्या जोडीत आता माझा पारनेर तालुका देखील आता असल्याने मला अभिमान असून कारखान्याचे संचालक मंडळ ऊस उत्पादकांच्या विश्वासास पात्र ठरेल असे काम करत असल्याबद्दलही लंके यांनी समाधान व्यक्त केले.