ऊसतोडणी दरम्यान आढळले बिबट्या मादीसह दोन बछडे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : उसाच्या फडात तोडणी सुरूअसताना अचानक बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे दिसून आल्याने  मजुरांची चांगलीच धांदल उडाली. घाबरून ऊसतोड तेथून लगेच सैरभर पळू लागले. सुदैवाने मादीने कोणावर हल्ला केला नाही. ही घटना बल्लाळवाडी (ता. जुन्नर) येथे घडली.

बल्लाळवाडीतील शेतकरी केशव नायकोडी यांच्या उसाच्या फडात तोडणी सुरू होती. या दरम्यान अचानक फडात विवट्याची मादी व दोन बछडे दिसले. त्यामुळे ऊसतोड मजूर घाबरून फडाबाहेर सैरभर पळू लागल्याने येथील वातावरण गंभीर बनले होते. सुदैवाने मादीने कोणावरही हल्ला केला नाही.

दरम्यान, याबाबतची माहिती वन विभागास दिल्यानंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ड्रोनच्या साहाय्याने 8 मार्च रोजी फडावरून मादी व बछड्यांचा शोध घेतला असता ते दिसून आले. त्यामुळे  काही तास ऊसतोड थांबविण्यास सांगितले. मंगळवारी (दि. ११) पुन्हा ड्रोनने पाहणी केली असता ते आढळून आले नाहीत. परंतु, मजुरांनी ऊस तोडण्यास नकार दिला. बुधवारी (दि. १२) सकाळी पुन्हा वन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ऊसतोड केली जाणार आहे. तोड सुरू करण्यापूर्वी ड्रोनने पाहणी केली जाणार आहे, असे वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण यांनी सांगितले.

दरम्यान, बिबट्याची मादी व बछड्यांमुळे तोडलेला ऊस दोन-तीन दिवस फडातच पडून राहिल्याने नुकसान झाले आहे. कारखान्याने तात्काळ पर्यायी व्यवस्था करून उर्वरित उसाची तोडणी करावी, अशी मागणी नायकोडी यांनी केली आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »