पारनेर कारखाना विक्री गैरव्यवहारातील कोट्यवधींच्या मशिनरी गायब!

पारनेर : पारनेर साखर कारखाना विक्री गैरव्यवहारातील मुद्देमाल असलेली मशिनरी आणि पेट्रोलपंपही कारखाना कार्यस्थळावरून गायब झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याची किंमत अंदाजे सुमारे १५० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारखाना विक्री गैरव्यवहार प्रकरणातील गुन्ह्याच्या मुद्देमालाची चौकशी करण्याकामी तपासी अधिकारी व फिर्यादी असलेल्या कारखाना बचाव समितीने संबंधित कारखान्याची पाहणी केली असता साहित्य गायब झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांकडून त्याचा स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे. कारखाना बचाव समितीने पोलिसांकडे संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्याची आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारखाना बचाव समितीने या गुन्ह्यातील मुख्य मुद्देमाल असणाऱ्या कारखाना मशिनरीचा पंचनामा करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
तपासणी आणि धक्कादायक निष्कर्ष
तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक समीर बारवकर, कारखाना बचाव समितीचे प्रमुख तसेच दोन सरकारी पंच यांच्या उपस्थितीत पारनेर साखर कारखान्याच्या साईटची पाहणी केली. यावेळी कारखान्यातील मुख्य यंत्र सामग्री, उपकरणे, वाहने, स्टील स्ट्रक्चर्स, इलेक्टिक मोटर्स व सुटसुटीत यंत्रे गायब झाल्याचे उघडकीस आले. तसेच कारखान्याच्या आवारातील पेट्रोलपंपही गायब केला. त्याचाही स्वतंत्र पंचनामा करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा पोलिसांनी अधिकृत पंचनामा केला असून ही यंत्रसामग्री आरोपींनी जाणून बुजून इतरत्र हलवली असल्याचे प्रथमदर्शन स्पष्ट झाले.
न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा
जानेवारी २०२५ मध्ये पारनेर न्यायालयाने या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. आरोपींकडून दाखल करण्यात आलेल्या पुर्नविचार याचिकेवर अहमदनगर सत्र न्यायालयाने २ जुलै २०२५ रोजी स्थगिती उठवून याचिका फेटाळली आणि तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले. आता तपासाला वेग आला असून साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे.
हे आहेत आरोपी
या प्रकरणात राज्य सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आणि क्रांती शुगर कारखान्याचे पदाधिकारी, काही प्रभावशाली मंडळी यांच्यावर गंभीर आरोप आहेत. त्यामध्ये राज्य सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी अनंत भुईभार व अनिल चव्हाण, क्रांती शुगरचे चेअरमन ज्ञानेश नवले, पांडूरंग नवले, दत्तात्रेय नवले, भिकु नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले, निवृत्ती नवले यांचा समावेश आहे.
बचाव समितीची मागणी
शेतकरी सभासदांच्या खिशातील पैसे लाटून, त्यांच्या मेहनतीचा घाम गाळुन केलेल्या या लूटमारीचा पर्दाफाश होत आहे. कारखाना बचाव समितीने मागणी केली आहे की, गायब झालेला मुद्देमाल तातडीने जप्त करावा, संपूर्ण यंत्रसामग्रीचा मागोवा घेउन दोषींना अटक करावी, शेतकरी सभासदांना या आर्थिक लुटीपासून न्याय मिळावा.






