नव्या दमाच्या साखर कारखानदारांसह ७९ जण आमदारकीच्या आखाड्यात

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी नव्या दमाचे अनेक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात सत्यशीलदादा शेरकर, अभिजितआबा पाटील, राहुल आवाडे आदींचा समावेश आहे.
तसेच समरजिसिंह घाटगे यांच्यासह अनेक तरुण साखर कारखानदारही आमदारकीच्या आखाड्यात उतरले आहेत. काहींची दुसरी, तर काहींची तिसरी पिढी रिंगणात आहे. कोल्हे कारखान्याचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही तयारी केली होती. त्यांना चांगली संधी होती. त्यांना जनतेची पसंती मिळाली असती. मात्र त्यांनी ऐनवेळी निर्णय बदलला आणि रिंगणाच्या बाहेर राहणेच पसंत केले.

राज्यात 79 उमेदवार
राज्यातील 288 पैकी 55 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी 79 उमेदवार थेट रिंगणात उतरवले आहेत आणि काही जण खासगी किंवा सहकारी म्हणून असलेल्या साखर कारखान्यांशी संबंधित आहेत. हे साखर उद्योग आणि महाराष्ट्रातील निवडणुकीचे राजकारण यांच्यातील सहजीवनाचे नाते दर्शवते.
सत्ताधारी महायुतीचे सर्वाधिक 33 उमेदवार रिंगणात असून, विरोधी महाविकास आघाडीचे 27 उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
उमेदवार एक तर चेअरमन, संचालक किंवा साखर कारखानदारी नियंत्रित करणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या मुला-मुलींसारखे निकटवर्तीय आहेत. महाराष्ट्रातील साखर उद्योगाची एकूण वार्षिक उलाढाल सुमारे एक लाख कोटींवर गेली आहे. सुमारे 40 लाखांवर शेतकरी या कारखान्यांचे ऊस पुरवठादार आहेत. सुमारे दोन कोटी मतदार साखर उद्योगाशी संबंधित आहेत. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांशी निगडीत राजकारण्यांचे वर्चस्व आहे, त्यापाठोपाठ मराठवाडा विभागात साखर कारखानदारांची आणि दुग्ध उत्पादन क्षेत्रातील नेत्यांची राजकारणावर छाप आहे.
राजकारण्यांना सहकारी आणि विशेषतः साखर सहकारी संस्थांचा निवडणुकांमध्ये कसा लाभ मिळतो हे १९८० नंतर समजू लागले. साखर उद्योगामुळे हजारो शेतकऱ्यांशी थेट संबंध येतो आणि राजकारणावर नियंत्रण ठेवणे अगदी सोपे बनते. साखर उद्योगावरील नियंत्रणामुळे राजकीय घराणेशाहीच्या वाढीला चालना मिळाली आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात किमान तीन पिढ्यांनी त्याचा फायदा घेतला.
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांचे वर्चस्व असलेल्या 16 साखर कारखान्यांना केंद्र सरकारने सुमारे 2,400 कोटी रुपये मंजूर केले. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या हमीसह कर्जाला मुदतवाढ दिली आहे. त्याचा फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना होईल, अशी अटकळ आहे.
मराठवाड्यात २४ जण रिंगणात
मराठवाड्यामध्ये अमित देशमुख, तानाजी सावंत, राजेश टोपे, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह साखर उद्योगाशी संबंधित दोन डझनावर उमेदवार मैदानात उतरले आहेत. लातूर शहर मतदारसंघातून उमेदवारी घोषित झालेल्या अमित देशमुख २००९ च्या विधानसभा निवडणुकीपासून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. त्यांचा मांजरा परिवार ते स्वत: आणि चुलते दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १२ खासगी व सहकारी कारखाने चालवतात. राजेश टोपे सहा वेळेस निवडून आले आहेत. तर रत्नाकर गुट्टे यांच्यावर अनेक अरोप असताना व ते कारागृहात असतानाही गंगाखेड मतदारसंघातून २०१९ मध्ये निवडून आले होते.
महाराष्ट्राच्या राजकारणावर वचक निर्माण करण्यासाठी भाजपने या क्षेत्राचा पुरेपूर उपयोग केला असे साखर कारखाना विक्रीतील घोटाळ्यांवर याचिका दाखल करणाऱ्या माणिक जाधव यांचे मत आहे. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातून निवडणुकीसाठी उतविण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तरी बहुतांश साखर कारखांनदारांची नावे पुढे येतात. अजित पवार यांचे भाजपबरोबरचे नवे मैत्र, हे याच कारणातून निर्माण झाले.’ मराठवाड्यातून प्रमुख नेत्यांबरोबरच भोकरदनमधून संतोष दानवे, रमेश आडसकर ही राजकीय नेत्यांच्या वारसाची ताकदही साखरगोडीमध्येच दडलेले आहे. खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया, रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे, बाबुराव आडसकर यांचा मुलगा रमेश आडसकरही हेही साखरेच्या राजकारणाचे लाभ ओळखून आहेत.
हे प्रमुख कारखांनदार निवडणुकीच्या रिंगणात
धनंजय मुंडे – परळी, प्रकाश साेळंके – माजलगाव, बाबासाहेब पाटील – अहमदपूर, घनसांगवी – राजेश टोपे, वसमत – जयप्रकाश दांडेगावकर, तानाजी सावंत – परंडा, औसा -अभिमन्यू पवार, निलंगा- संभाजी पाटील, तुळजापूर -राणा जगजीतसिंह
राज्याच्या राजकारणातील अंमलबजावणी संचालनालयाकडे देण्यात आलेली बहुतांश प्रकरणे साखर कारखाना विक्रीबाबतची आहेत. याबाबतची पहिली तक्रार अण्णा हजारे आणि कॉ. माणिक जाधव यांनी रमाबाई आंबेडकरनगर पोलिस ठाण्यात केली होती. राज्य बँकच्या लेखा परीक्षणात, सहकार खात्यांच्या ८८ कलमान्वये केलेल्या चौकशीमध्ये पुढे राज्य बँकेवर प्रशासक नेमताना साखर कारखान्यांना दिलेली कर्ज आणि त्यातून नियमबाह्य झालेल्या बाबींवर बोट ठेवत मोठा गहजब करण्यात आला. अनेकांवर अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले. पुढे अजित पवार यांच्या विरोधात अनेक आरोप झाले. आरोपाने ज्या भाजपने राष्ट्रवादीतील नेत्यांना घेरले होते. ते अजित पवार भाजपच्या बरोबर आले.
पश्चिम महाराष्ट्र
यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, बाळासाहेब देसाई, तात्यासाहेब कोरे, रत्नाप्पा कुंभार, नागनाथ नायकवडी इ. दिग्गज नेत्यांच्या सहकारातील योगदानामुळे पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारी चांगलीच रुजली. सध्याच्या निवडणुकीत सुमारे २५ हून अधिक कारखानदार निवडणूक रिंगणात आहेत.
सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात साखर कारखानदारी आणि सूत गिरण्या हे सहकारातील उद्योग चांगले रुजले आहेत. या उद्योगांच्या निमित्ताने गावातील अनेक तरुणांना रोजगार देता आला. त्यांचे संसार उभे राहिले आहेत. त्यामुळे हे लोक साखर आणि सूत गिरणी कारखानदारांशी जोडले गेले आहेत. यांच्या मदतीनेच अनेकांना विधानसभा निवडणुकीत आपला विजय सोपा करणे शक्य होते.
काही प्रमुख उमेदवार
सातारा – बाळासाहेब पाटील, अतुल भोसले, मनोज घोरपडे, प्रभाकर घार्गे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील या उमेदवारांच्या ताब्यात साखर कारखाने आहेत. कोणी या कारखान्यांचे चेअरमन आहे तर कोणी संचालक.
सांगली- मानसिंगराव नाईक, पलूस कडेगाव संग्रामसिंह देशमुख, विश्वजीत कदम, तासगाव कवठेमहांकाळ संजयकाका पाटील, जयंत पाटील तर सहा उमेदवार हे बँका आणि कारखान्याचे संचालक आहेत.
कोल्हापूर – के. पी. पाटील, चंद्रदीप नरके, राहुल पाटील, राजू आवळे, अमल महाडीक, हसन मुश्रीफ, समरजीत घाटगे, विनय कोरे, राहुल आवाडे, अशोकराव माने. गणपतराव पाटील, ए. वाय. पाटील, राजेश पाटील, नंदिनी बाभूळगावकर हे उमेदवार सहकारी कारखानदारी आणि सूत गिरण्यांशी संबंधित आहेत.
पुणे जिल्ह्यात अजित पवार, दिलीपराव वळसे पाटील, सत्यशील शेरकर, अतुल बेनके, हर्षवर्धन पाटील, रोहित पवार (जिल्ह्याबाहेर), संग्राम थोपटे, विजय शिवतारे, अशोक पवार इ. निवडणूक रिंगणात आहेत.