१३ पासून आचारसंहिता लागू, गाळप हंगामातच मतदान
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या हालचालींना निवडणूक आयोग पातळीवर सुरूवात झाली असून, येत्या १३ ते १५ ऑक्टोबर दरम्यान, आचारसंहिता जारी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. याचा अर्थ ऐन निवडणुकीत ऊस गळीत हंगाम सुरू होणार आहे.
यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याचे मंत्रिसमितीने जाहीर केले आहे, तर दसरा संपताच राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याच्या तारखेपासून किमान ४० दिवसांचा काळ निवडणुकीसाठी नियमानुसार द्यावा लागतो. म्हणजे यंदाचा ऊस गळीत हंगाम निवडणुकीच्या धामधुमीतच सुरू होणार आहे. हंगाम सुरू झाल्यानंतरच काही दिवसांतच मतदान होईल, ते दोन टप्प्यात होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर गाळप हंगामावर त्याचा काही परिणाम होणार नाही, असे सकृतदर्शनी दिसत असले तरी ऊसतोड कामगारांची संख्या पाहता ते मतदानासाठी आपापल्या गावी गेल्यास तोडणीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. तसेच काही साखर कारखानदार यंदाच्या निवडणुकीत उतरण्याची शक्यता लक्षात घेता, प्रलंबित बिले अदा करण्यावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, ताज्या वृत्तानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आठ दिवसांत आचारसंहिता लागू शकते, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे विधानसभा मतदानाची प्रक्रिया ऊस गळीत हंगामातच होणार असे स्पष्ट झाले आहे.
Tungath