साखर उत्पादनात देशात महाराष्ट्राचे अव्वल स्थान कायम

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत, महाराष्ट्रातील साखर उद्योगाने देशात आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. यंदाच्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील सहकारी व खासगी अशा एकूण २०७ साखर कारखान्यांनी १०९ लाख टन साखर उत्पादन केले आहे.

देशात साखर उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी कायम ठेवली आहे. इथेनॉल निर्मितीवर आणलेल्या बंदीनंतर २०२३- २४ च्या गाळप हंगामात महाराष्ट्रातील एकूण सहकारी व खासगी अशा २०७ साखर कारखान्यांतून सुमारे १०९१.३६ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नांदेड व अहमदनगर या विभागांतून सर्वाधिक म्हणजे ९९१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.

देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, उत्तर प्रदेश या तीन राज्यांचा सर्वाधिक वाटा असतो. गेल्यावर्षी पावसाने दडी मारल्याने आणि वातावरणातील बदलामुळे उसाच्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यात साखरेचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे २०२३-२४ चा गाळप हंगाम सुरू होताच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी आणि साखरेला मिळालेला चांगला उतारा, परिणामी साखरेचे उत्पन्न वाढले आहे.

महाराष्ट्रातील ऊसपट्ट्यातील कोल्हापूर, पुणे, सोलापूर, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अमरावती व नागपूर विभाग येथे सहकारी तत्त्वावरील १०३ व खासगी तत्त्वावरील १०४ असे २०७ साखर कारखाने सुरू होते. या साखर कारखान्यांतून यंदाच्या गाळप हंगामात १०६४.९५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन त्यातून १०९१.३६ लाख क्विटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

गेल्या वर्षीच्या २०२२-२३ च्या गाळप हंगामात २११ साखर (सहकारी १०६ व खासगी १०५) कारखान्यातून १०५३.९१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. त्यातून १०५२.३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले होते. २०२३-२४ च्या गाळप हंगामात चार कारखाने बंद असतानाही साखरेचे उत्पादन वाढले.

(१५ एप्रिल २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार साखर उत्पादन)

Sugar Production
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »