महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांचा सन्मान
सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या ११ व्या परिषदेमध्ये उसाचे एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना सन्मान करण्यात आला.
संघाचे अध्यक्ष अतुलनाना माने-पाटील यावेळी म्हणाले, की या ऊस परिषदेत महाराष्ट्रातील ऊस शेतीचे आजचे चित्र सर्वांच्या नजरेसमोर आहे. ऊस शेती करणारे शेतक-यांची स्थिती नाजूक झाली असून, ऊस शेतीमधील समस्या वाढत आहेत.
या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी ऊस शेतीतील विचारवंत आणि ऊस शेतीशी पुरक उद्योजकांनी एकत्रित येऊन या परिस्थितीवर योग्य चर्चा करून त्याचे कारण शोधून त्याच्यावर ठोस उपाययोजना सुचविण्याची गरज निर्माण झाली असून या गरजेची पुर्तता करण्यासाठीच महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाने राज्यस्तरीय ऊस विकास परिषदेचे आयोजन केले.
या ऊस परिषदेत आधुनिक ऊसपिक तंत्रज्ञान विषयाचे मार्गदर्शन झाले. परिषदेला कृषिरत्न संजीव माने, केळी उत्पादक संधाचे अध्यक्ष किरण चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी शहाजी कदम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
खोडवा ऊस व्यवस्थापनावर श्री. कृष्णांत पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर जैन इरिगेशन लि. शामकांत पाटील ऊस पीक ठिबक सिंचन आधुनिक प्रणाली या विषयाची माहिती दिली. अन्य तज्ज्ञांनीही विविध विषयांवर प्रबोधन केले.