साखर मूल्यांकन दर ३८०० रु. करा : साखर संघाची मागणी

पुणे/मुंबई : सहकारी साखर कारखान्यांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ मर्यादित (Mahasugarfed) ने खुल्या बाजारातील साखरेच्या मूल्यांकन दरात (Valuation Rate) वाढ करण्याची मागणी केली आहे. संघाने महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. (MSC Bank) कडे पत्र लिहून किमान रू. ३८०० प्रति क्विंटल मूल्यांकन करावे, अशी आग्रहाची मागणी केली आहे.
बाजारभावावर आधारित मागणी:
साखर संघाने, मागील तीन महिन्यांच्या साखरेच्या सरासरी बाजारभावाचा विचार करून, मूल्यांकन दर काढले आहेत. तसेच मंत्री समितीच्या बैठकीत बँकेने संघाकडे सुधारित साखर मूल्यांकन करून द्यावे, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले होते, याकडेही पत्रात लक्ष वेधले आहे.
पत्रात नमूद केल्यानुसार, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२५ या तीन महिन्यांकरिता एस-ग्रेड (S-Grade) साखरेचे स्थानकावरील दर सादर केले आहेत:
| अ. क्र. | महिना | एस–ग्रेड साखरेचा कारखाना स्थळावरील दर |
| १ | ऑगस्ट, २०२५ | रु. ३८६६.५९ |
| २ | सप्टेंबर, २०२५ | रु. ३८३०.५४ |
| ३ | ऑक्टोबर, २०२५ | रु. ३७९७.०८ |
| सरासरी त्रैमासिक दर | रु. ३८३१.४० |
या त्रैमासिक सरासरी बाजारभावाचा (रु. ३८३१.४०) विचार करून साखर संघाने मागणी केली आहे की, यापूर्वी एप्रिल मध्ये रु. ३,६००/- प्रति क्विंटल निश्चित केलेला साखरेचा मूल्यांकन दर वाढवून तो रु. ३,८००/- प्रति क्विंटल करण्यात यावा .
साखर मूल्यांकन दरात वाढ करण्याची मागणी मागील महिन्यात देखील करण्यात आली होती. मूल्यांकन दर वाढवल्यास, साखर हंगाम २०२५–२६ साठी वाढविण्यात आलेली एफआरपी (FRP) रक्कम वेळेवर अदा करण्यास साखर कारखान्यांना मदत होईल, असेही पत्रात नमूद केले आहे.
साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ यांनी स्वाक्षरी केलेल्या या पत्राची प्रत सर्व साखर कारखान्यांनाही पाठवण्यात आली आहे.





