शंभर टनी ऊस उत्पादकांच्या हस्ते ‘माळेगाव’च्या गळीताचा शुभारंभ
पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा २०२४- २०२५ चा ६८ वा गळीत हंगामाचा प्रारंभ सोमवारी ( दि. ११) प्रति एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेणाऱ्या सभासदांच्या हस्ते करण्यात आला.
यंदाचा हंगाम १५ नोव्हेंबरपासून सुरू होत असून आडसाली उसाला प्राधान्य देणार आहे. या हंगामात १५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असून ऊस तोडणी कामगार येण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी दिली.
यावेळी एफआरपी सरासरी उतारा १०.२५ टक्के गृहीत धरुन ३१५० वरुन ३४०० रुपये प्रतिटन वाढवण्यात आली आहे, मात्र एम.एस.पी. मध्ये वाढ झालेली नाही. ४० रुपये प्रतिकिलो अशी एम.एस.पीची शिफारस होऊन ती वाढली नसल्याचे त्यांनी सांगितले.
कारखान्यामधील अंतर्गत कामे पूर्ण झाली आहेत. माळेगाव कारखान्याने राज्यात उच्चांकी म्हणजे ३६३६ रुपये प्रतिटन असा बाजारभाव दिला आहे. कामगारांना २५ टक्के बोनस देऊ केला आहे. कारखान्याचे अध्यक्ष केशवराव सर्जेराव जगताप, उपाध्यक्ष तानाजीराव देवकाते, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मंगेश जगताप, निशिकांत निकम, दत्तात्रेय येळे, विलास कोकरे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील उपस्थित होते.
ऊर्मिला राजेंद्र जगताप यांनी करून आभार व्यक्त केले.