मंडलिक कारखाना उसाला देणार ३५०० चा दर

कोल्हापूर ः हमिदवाडा येथील सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना सन 2025-26 गळीत हंगामाकरिता येणाऱ्या उसाला प्रति मे.टन रु. 3500 रुपये दर देणार आहे. पहिला हप्ता म्हणून रुपये 3410 रुपये देण्यात येणार असून उर्वरित रक्कम हंगाम समाप्तीनंतर देणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन संजयदादा मंडलिक यांनी नुकतीच आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन मा. आनंदराव फराकटे, संचालक मा. विश्वासराव कुराडे, मा. नेताजी पाटील, मा. संभाजी मोरे, मा. तुकाराम ढोले. मा. पुंडलिक पाटील, मा. विष्णू बुवा, मा. भगवान पाटील, मा. कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, मुख्य शेती अधिकारी श्री प्रताप मोरबाळे उपस्थीत होते.
स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी नेहमीच शेतकरी हिताचा विचार करून एफआरपीपेक्षा ज्यादा ऊसदर दिलेला होता. त्यांनी वेळो वेळी झालेल्या ऊसदर आंदोलनाची कोंडी फोडलेली होती. या हंगामात देखील सुरुवातीस रुपये 3410/- दर जाहिर करून स्वर्गीय मंडलिकसाहेबांच्या ऊसदराची कोंडी फोडण्याची परंपरा चेअरमन संजयदादा मंडलिक यांनी कायम राखलेली आहे. त्यामुळे मंडलिक कारखान्यावर नितांत प्रेम असणाऱ्या ऊस पुरवठादार सभासद व बिगर सभासद शेतकऱ्यांनी हंगाम सुरुवातीपासून सुरळीत व विना अडथळा ऊस पुरवठा करून कारखाना व्यवस्थापनावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांनी सर्व शेतकरी बांधव व विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी यांचे विशेष आभार मानले. त्याचप्रमाणे कर्नाटक सीमाभागातील ऊस पुरवठादार शेतकरी व विविध शेतकरी संघटना यांनीही कारखाना व्यवस्थापनावर व कारखान्याचा वजन काटा चोख असल्याबद्दल विश्वास व्यक्त करून ऊस पुरवठा करीत आहेत. त्याबद्दलही त्यांचे विशेष आभार मानले.






