साखरेचे ब्रँडिंग : काळाची गरज

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले. या उद्योगासमोर नेमक्या काय अडचणी आहेत, त्यावर कोणते दीर्घकालीन आणि लघुकालीन इलाज लागू होतात, धोरण दिशेबाबत उद्योगाची अपेक्षा काय आहे…. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक श्री. मंगेश तिटकारे लिहिताहेत ‘शर्करायन’ या नव्या सदरातून…. या लेखात ते लिहिताहेत भारतीय साखर उद्योगातील उत्पादनांच्या ब्रँडिंग बाबत…

Sugar Branding

ब्रँडिंगची पार्श्वभूमी आणि इतिहास
ब्रँड हे नाव, संज्ञा, डिझाईन, चिन्ह किंवा इतर कोणतेही एक वैशिष्टय आहे, जे एका विक्रेत्याने तयार केलेल्या विविध मालाबद्दलच्या सेवा, त्याचा दर्जा व मत, किंमतीबाबतचे इतर विक्रेत्यांपेक्षा वेगळे करते. ब्रँडचा वापर व्यवसाय, नियमन आणि जाहिरातींमध्ये ओळखीसाठी केला जातो. जाहिरात व ब्रँडिंग या बाबी उत्पादनाची ओळख दूरवर करुन देतात आणि त्यामुळे बाजारात उत्पादनाची पत आणि मूल्य वाढते. ब्रँड इक्विटी म्हणून त्याचे मूल्य वाढल्याने बाजारात पत वाढून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल करणे शक्य होते. एका ब्रँडचे नाव सर्वतोमुखी झाले की त्या उत्पादनाची विक्री अधिक मूल्य लावूनही मोठ्या प्रमाणावर होऊ शकते.

ब्रँडिंगची प्रथा प्राचीन इजिप्शियन लोकांपासून सुरू झाली असे मानले जाते. इ.स.पूर्व 2700 वर्षापासून पशुधन किंवा गुलाम यांना अंगावर विशिष्ट ठिकाणी गरम लोखंड किंवा तत्सम वस्तू वापरुन कानाखाली पायावर छोटया खुणा केल्या जात असत. याद्वारे एका व्यक्तीची गुरे व गुलाम दुसर्‍या व्यक्तीच्या गुरे व गुलाम यांच्यापासून वेगळी ओळखली जात असत.

साखर उद्योगाशी संबंधित उत्पादनांच्या ब्रँडिंगचा उपयोग भारतात सर्वप्रथम रावळगाव उद्योग समूहामध्ये करण्यात आला. रावळगाव शुगर्सची स्थापना शेठ वालचंद हिराचंद यांनी सन 1933 साली केली. या साखर कारखान्यात गोळ्या, चॉकलेट बनविण्याचा विभाग त्यांनी 1942 साली स्थापन केला. साखर उद्योगाशी संबंधित कन्फेक्शनरी उद्योगातील तो सर्वात पहिला प्रसिद्ध व मोठा ब्रँड आहे. साखर उद्योगाशी संबंधित उत्पादनाचे ते भारतातील पहिले ब्रँडिंग असल्याचे म्हणता येईल. रावळगावने केलेली उत्पादने, वापरलेल्या ब्रँडचे नाव हे सर्वतोमुखी झाले. त्यांची इतर चॉकलेट्स, गोळ्या, कन्फेक्शनरी दूरदूरवर पोहोचली व लोकप्रिय झाली.

सद्य:स्थितीत भारतात साखर उद्योगात ब्रँडिंग आघाडीच्या साखर कंपन्यांकडून करण्यात येते. या साखर कंपन्या व त्यांची साखर विषयक ब्रँडिंग उत्पादने पुढील प्रमाणे आहेत…

1) EID पॅरी – चेन्नई येथे मुख्यालय असलेली, सन 1788 मध्ये स्थापना झालेली. EID पॅरी ही भारतातील सर्वात मोठ्या 10 साखर कंपन्यांपैकी एक आहे. सन 1843 मध्ये भारतात डिस्टिलरी सुरू करणार्‍या या कंपनीचा सन 1845 पासून साखर उद्योग सुरु झाला. त्यांचा ‘पॅरीज प्युअर’ Parry’s Pure refine sugar साखर ब्रँड भारतातील उच्च दर्जाचा ब्रँड मानला जातो. पॅरीसमूह भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये असलेले 7 मोठे साखर कारखाने चालवतात.
हे आधुनिक साखर कारखाने हंगामात दररोज 40,300 टन उसाचे गाळप करू शकतात व 140 मेगावॅट वीजदेखील तयार करतात. शिवाय मळीपासून हंगामात दररोज 5,98,000 लिटर अल्कोहोल तयार करतात. ही कंपनी पांढरी, तपकिरी आणि सोनेरी साखरेसह विविध प्रकारची साखर उत्पादने बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचा गंधकमुक्त साखरेचा ‘‘व्हाईट लेबल’’ ब्रँड व गोल्ड प्रिमियम ब्राऊन शुगर हे ब्रँड दक्षिण भारतात प्रसिध्द आहे.

2) श्री रेणुका शुगर्स : मुंबईत मुख्यालय असलेल्या श्री रेणुका शुगर्सचे कामकाज सन 1947 सालामध्ये सुरू झाले. त्यांनी उत्पादित केलेला ‘मधुर’ हा भारतातील एक सुप्रसिद्ध साखर उत्पादक ब्रँड आहे. त्यांनी बनवलेली साखर उच्च-गुणवत्तेची आहे. असा त्यांचा दावा आहे. ही साखर मिठाई, दुग्धजन्य पदार्थ आणि बेक केलेले पदार्थ बनवण्यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते. श्री रेणुकाने स्थानिक बाजारपेठेत स्वत:साठी चांगले स्थान निर्माण केले आहे आणि साखरेच्या वस्तूंची वाढती मागणी पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

साखर शुद्धीकरण आणि इथेनॉल बनवणारी ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. त्यात साखर शुद्धीकरण सुविधांसारख्या मोठ्या प्रमाणावर ऑपरेशन्स आहेत जे हंगामात दररोज 40,000 टन प्रति दिन गाळप हाताळू शकतात आणि 6,00,000 लीटर इथेनॉल तयार करण्यास सक्षम डिस्टिलरीजसह 2019 मध्ये, श्री रेणुका शुगर्सने जागतिक बाजारपेठेत सर्व भारतीय साखर निर्यातीपैकी एक पंचमांश (20%) हिस्सा व्यापला आहे. कंपनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील प्रमुख ऊस उत्पादक भागात 8 मोठे साखर कारखाने चालवते. साखर आयात आणि निर्यात करण्यासाठी बंदरांवर दोन मोठ्या रिफायनरीज आहेत.

त्यांचा ‘मधुर’ शुगर ब्रँड 1 किलो, 5 किलो व 10 किलो मध्ये ग्राहक / मॉलसाठी तयार केला जातो. गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर हा ब्रँड विकला जातो. सन 2007 पासून श्री रेणुका शुगर्सच्या बेळगाव फॅक्टरीमध्ये हा माल तयार केला जातो. मधुर शुगरची प्युअर, हायजेनिक फाईन ग्रेन्स नॅचरल, सल्फर फ्री अशी जाहिरात करतात. रु. 52/- ते 54/- किलोने ते याद्वारे साखर रिटेल मार्केट मध्ये विकतात. भारतातील ब्रँडेड साखरेची 30% हून अधिक बाजारपेठ या साखरेने व्यापली आहे, असा अंदाज आहे.

3) त्रिवेणी इंजिनिअरिंग अँड इंडस्ट्रीज लि. : ही भारतातील अग्रगण्य साखर कंपन्यांपैकी एक आहे. त्रिवेणीने अनेक दशकांपासून अल्कोहोल, वॉटर सोल्यूशन्स, पॉवर ट्रान्समिशन आणि संरक्षण यासारख्या इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये मुख्यत: इंजनिअरिंग क्षेत्रात विविधता आणली आहे. कंपनीच्या साखर विभागाने तिच्या एकूण कामगिरीला चालना देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. तिचा आर्थिक वर्ष 2016 ते 2023 या कालावधीत महसूल दुप्पट झाला आहे.
त्रिवेणी ही FSSC 22000 Certified शुगर कंपनी असून त्यांचे रिफाईंड शुगर, क्रिस्टल शुगर, या पॅकद्वारे विकले जाते. त्यांचा त्रिवेणी शुगर ब्रँड 1 Kg, 5 Kg वजनाच्या बॅगेत मध्ये ग्राहक/ मॉलसाठी तयार केला जातो.

4) बन्नरीअम्मन : ही 1947 मध्ये स्थापन झालेली दक्षिण भारतातील आघाडीची साखर उत्पादक कंपनी आहे. कंपनीची साखर, मॉल, औद्योगिक इंडस्ट्रीज, विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. बन्नरीअम्मन यांचे भारतीय बाजारपेठेत चांगले स्थान आहे. साखरेशी संबंधित उत्पादनांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी बन्नरीअम्मन सल्फर फ्री शुगर, प्रोसेस केन शुगर बन्नरी, One-up refined शुगर या नावाने अर्धा किलो, एक, किलो ब्रँडेड साखर वितरीत करीत आहे. तसेच रिफाईंड शुगर, आयएसओ – 9002 दर्जाची साखर ते मोठ्या प्रमाणावर वितरीत करीत आहेत. सल्फर फ्री शुगर अनटच्ड बाय हँड्स, अल्ट्राप्युअर अशी ते स्वत:च्या साखरेची जाहिरात करीत आहेत. दक्षिण भारतातील साखरेच्या बाजारपेठेत त्यांच्या ब्रँडने रिटेल मार्केटचा बराच भाग व्यापला आहे.

5) दालमिया शुगर : 1905 मध्ये सुरू झालेला दालमिया शुगर हा भारतातील एक प्रसिद्ध साखर ब्रँड आहे. ही कंपनी मिठाई आणि दुधावर आधारित खाद्यपदार्थ, मिठाईत वापरल्या जाणार्‍या उच्च-गुणवत्तेची साखर तयार करते. कंपनीकडे संपूर्ण भारतभर वितरणासाठी एक कार्यक्षम नेटवर्क आहे, ज्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत तिच्या उत्पादनांना सहज प्रवेश मिळतो. कंपनी 120 मेगा वॅट सह-उत्पादन क्षमता, 255 KLPD डिस्टिलरी आणि कच्च्या साखर प्रक्रिया करण्यातही अग्रगण्य कंपनी आहे. जागतिक दर्जाच्या प्रणालींनी सुसज्ज अत्याधुनिक युनिट्स आहेत जी कोका-कोला, पेप्सिको ब्रँड्स सारख्या जगातील शितपेये उद्योगातील बलाढय कंपन्यांना पुरवल्या जाणार्‍या उच्च दर्जाची साखर तयार करतात.

दालमियाच्या ब्रँडमध्ये नॅचरल शुगर मळीमुक्त मिनरल्स, मल्टीपल आयर्न मिनरल्स इ. खनिजे या साखरेत आहेत व ही साखर आरोग्यास हितवर्धक, लवकर विरघळणारी आहे. अशी या साखरेची ते जाहिरात करतात. त्यांचे उत्सव ब्राईट क्रिस्टल शुगर व दालमिया उत्सव ब्राऊन शुगर या नावाचे लोकप्रिय ब्रँड बाजारात आले आहेत. साखर ICUMSA ग्रेड खेप Ion exchange टेक्नॉलॉजीचा वापर करुन दाणेदार बनवली आहे. सल्फर फ्री व आरोग्याला चांगली, अनटच्ड बाय हँन्ड्स असे ते आपले वेगळेपण दाखवतात.

6) धामपूर शुगर मिल : 1947 मध्ये स्थापन झालेली धामपूर शुगर मिल ही देशातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक कंपन्यांपैकी एक असून त्यांनी बनवलेल्या साखरेला उच्च-गुणवत्तेच्या साखरेचा एक वेगळा फायदा मिळतो, यासाठी कंपनी प्रसिद्ध आहे. कंपनी व्हाईट क्रिस्टल शुगरचे ब्रँड बाजारात आणते. धामपूर ग्रीन वेस्टर्न खांड नावाने ऑरगॅनिक शुगर त्यांनी बाजारात आणली आहे. 100 ग्रॅम साखर रु. 78/- ला अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. धामपूर ऑरगॅनिक ब्राऊन शुगर 500 ग्रॅम रु. 198/- ला, तर ‘I’m lite sugar ब्रँड पाच किलो वजनाचा 349 रुपये मूल्यात बाजारात आणला आहे. धामपूर इंडियन बत्तासा हा ब्रँडेड पॅक्ड पारंपरिक खाद्य पदार्थ 200 ग्रॅम वजनाचा रु. 99/- ला बाजारात आणला आहे. बत्तासा हा पारंपरिक खाद्य पदार्थ, धार्मिक विविध, प्रसाद स्वरूपही वापरला जाणारा खाद्य पदार्थ असून, तो 100% साखरेपासून बनतो. हा खाद्य पदार्थ ब्रँडिंगद्वारे बाजारात आणण्यात कंपनीने चांगली कल्पकता दाखवली आहे, जी लहान मुले, तरुण वर्ग तसेच तमाम जनतेला आकर्षित करते.

7) द्वारिकेश शुगर : 1947 मध्ये सुरू झालेली द्वारिकेश शुगर भारतातील टॉप 10 साखर कंपन्यांमध्ये आहे. कंपनीने उत्कृष्ट साखर तयार करण्यावर भर दिला आहे. जी विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. द्वारिकेश शुगरचे भारतीय बाजारपेठेत चांगले स्थान आहे. द्वारकाधीश त्यांच्या साखरेची प्रिमियम शुगर , नॅचरल अँड हेल्दी शुगर, अशी जाहिरात करतात.

8) फॉर्च्युन शुगर – अदानी – विलमर ग्रुपने फॉर्च्युन शुगर ब्रँड बाजारात आणला आहे. त्याची एमआरपी रू. 65 प्रति किेलो आहे. श्री रेणुका ग्रुपच्या विपणन योजनेद्वारे संपूर्ण भारतात फॉर्च्युन साखरेचे वितरण होते. 1 कि., 5 कि., 10 कि. अशा पॅकिंगमध्ये त्याचे वितरण होत आहे. हे वितरण ’रिफाईंड क्रिस्टल शुगर’ नावाखाली होत असून 100 ग्रॅम साखरेतील घटक द्रव्येही ठळकपणे पॅकवर छापली आहेत. या पॅकची जाहिरातही त्यांनी आकर्षक केली आहे.

9) सिंभोली शुगर : उत्तर प्रदेशात विकला जाणार ट्रस्ट हा साखरेचा सुप्रसिद्ध ब्रँड आहे. तो ब्राऊन मिनरल, कॉफी शुगर आणि G-low नावाने वितरित करत आहेत. त्यांची गंधकमुक्त साखर, आईसिंग शुगर, डायबेटिक शुगर, सल्फरलेस शुगर, प्रसिद्ध आहेत. स्टार दर्जाचे हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स येथे त्याचे सॅचेट्स मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. ही साखर गंधकमुक्त, लगेच विरघळणारी साखर आहे. अशी जाहिरात केली जाते. हे सॅचेट्स युरोपीयन मानकाप्रमाणे बनवले जातात. त्यांची ही साखर ISO 9001:2015, ISO 14001:2015 व FSMS 22000:2004 गुणवंत्तेनुसार प्रमाणित आहे.

शुद्ध ऑरगॅनिक साखर तयार करणे हे मोठे क्लिष्ट, वेळखाऊ व जिकीरीचे काम आहे. ऊसाचे बियाणे, त्यांची लागवड, शेती, खते, कीटकनाशके, पिकांची वाढ, कापणीपासून साखर कारखान्यातील साखर तयार होऊन पॅकिंग होईपर्यंतच्या सर्वच प्रक्रिया नैसर्गिकरीत्या करणे अभिप्रेत असते. केमिकल्स, रासायनिक खते यांचा वापर ऊस लागवडीपासून साखर उत्पादनापर्यंत कटाक्षाने टाळावा लागतो. ऑरगॅनिक साखर तयार करण्याच्या क्षेत्रातही भारतात काम करण्यासाठी खूप वाव आहे. सद्यास्थितीत ऑरगॅनिक साखरचे देशात बरेच ब्रँड्स उपलब्ध आहेत. उपलब्ध माहिती नुसार Organic Soul देशी खांड (Raw Sugar) 45 रु. कि.ग्रॅ. शुगर 198 रुपयात विकली जात आहे. Nutrie Food, पुराणिक देसी खांड (Raw Sugar) 900 ग्रॅम पॅक 250 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे.

10) उत्तम शुगर्स : 1947 मध्ये स्थापन झालेली उत्तम शुगर्स हे भारतातील आघाडीच्या साखर उत्पादकांपैकी एक आहेत. विविध उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्‍या उच्च-गुणवत्तेच्या साखरेसाठी या कंपनीचे नाव आहे. उत्तर, मध्य आणि पश्चिम भारतात विस्तृत वितरण नेटवर्कसह, उत्तम शुगर अग्रगण्य स्टोअर्स, रेस्टॉरंट्स, एअरलाइन्स आणि रेल्वे तसेच रसना, ब्रिटानिया, कॅडबरी, पेप्सिको आणि मदर डेअरीसारख्या प्रमुख FMCG ग्राहकांना ते साखर पुरवतात. कंपनीने 122 मेगावॅट स्थापित क्षमता आणि 64 मेगावॅट निर्यातक्षम नवीकरणीय ऊर्जेसह ग्रीन पॉवरमध्येही पाऊल टाकले आहे. ते आता 300 KL प्रतिदिन इथेनॉल क्षमतेसह जैवइंधनावर लक्ष केंद्रित करत आहे. गंधकमुक्त ’बुरा’ डबल रिफाईन्ड 1 किग्रॅ पॅक अ‍ॅमेझॉनवर 90 रु. प्रति कि.ग्रॅ. विकला जातो. त्याच्या विक्रीत जाहिरातीचाही मोठा भाग आहे. S-30 दर्जाची ही साखर ते पॅकिंगसाठी वापरतात.

ब्रँडिंग आणि जाहिरातींमध्ये गुंतवणूक करून, तुम्ही एका कमोडिटीमधून साखरेचे एका विशिष्ट उत्पादनात रूपांतर करू शकता, ज्याची विशिष्ट ओळख आणि मूल्य मिळू शकते. होलसेल विक्रीतून ब्रँडेड कमोडिटीमध्ये यशस्वी संक्रमण साध्य करण्यात साखरेला अजून खूप वाव आहे.

धामपूर शुगर्स, त्रिवेणी अभियांत्रिकी, सिंभोली शुगर्स आणि मवाना शुगर्स या भारतातील आघाडीच्या ब्रँडेड साखर उत्पादकांची बाजारातील व्याप्ती लक्षणीय आहे. तथापि, ब्रँडेड साखर घरगुती वस्तू तितकीशी झालेली नाही. या कंपन्यांसाठीही, त्यांच्या एकूण विक्रीत ब्रँडेड विक्रीचा वाटा 1 ते 2 टक्के आहे. तथापि, सिंभोली ब्रँडेड विभागातील विक्रीचा वाटा 7-8 टक्के आहे कारण कंपनी शुगर क्यूब्स आणि सॅशेमध्ये देखील आहे. ब्रँडेड साखरेचे एकूण मूल्य सुमारे 600 कोटी रुपये आहे, एकूण साखर विक्रीच्या एक टक्काही नाही, ज्याचे मूल्य आता जवळपास 90,000 कोटी रुपये आहे.

ब्रँड ट्रस्ट अंतर्गत साखरेची विक्री करणार्‍या सिंभोली शुगरची ब्रँडेड विक्री दरवर्षी 25 टक्क्यांहून अधिक दराने वाढत आहे. संघटित आणि मोठ्या स्वरूपातील किरकोळ विक्री ब्रँडेड साखरेच्या विक्रीला चालना देत आहे, त्यांची ब्रँडेड साखर आता महानगरांच्या पलीकडे टियर-2 शहरांमध्ये बाजारात येत आहे.

ब्रँडेड साखर बाजाराचा आकार लहान आहे, त्यामुळे कंपन्यांना कमी मार्जिनही मिळते. हा कमी मार्जिनचा व्यवसाय आहे. 4-5 रुपये प्रति किलो प्रीमियम आकारला जातो. तो प्रामुख्याने पॅकेजिंग आणि वितरणामध्ये जातो. मार्जिन हे मोठ्या प्रमाणात विक्रीसारखेच असतात आणि काही वेळा त्याहूनही कमी असतात. बजाज हिंदुस्थान सारखे मोठे उद्योग अद्यापही त्या क्षेत्रात उतरले नाहीत. तसेच बलरामपूर चिनीसारख्या मोठ्या उद्योगांनी या क्षेत्रात थोडे प्रयत्न करून बाहेर राहणेच पसंत केले आहे. तथापि, या क्षेत्रात चिकाटीने प्रयत्न केल्यास शुगर ब्रँड्समुळे भविष्यात निश्चित जास्त फायदा होऊ शकतो हे निश्चित आहे.

किराणा स्टोअर्सद्वारे विकल्या जाणार्‍या साखरेच्या तुलनेत ब्रँडेड साखर 4-5 रुपये प्रति किलोच्या प्रीमियमने विकली जाते, परंतु अद्यापही अनेक ग्राहकांना प्रीमियम भरून खरेदी करण्यात, कोणतेही मूल्य दिसत नाही. ब्रँडेड साखरेच्या होणार्‍या जाहिराती ब्रँडेड साखरेचे वेगवेगळेपण ग्राहकांचे मन जिंकण्यास तितक्याशा यशस्वी ठरल्या नाहीत असेही म्हणता येईल. ही अजूनही वस्तुस्थिती आहे; परंतु ती भविष्यात बदलता येईल.

‘‘साखरेशिवाय, इतर सर्व ब्रँडेड वस्तूंमध्ये विशिष्ट मूल्य-प्रस्ताव असतात जे प्रीमियम किमतींना न्याय देतात’’, असे कमोडिटी विश्लेषक म्हणतात. रोजच्या वापरातील गव्हाचे पीठ, तेल, मीठ, तांदुळ, या सारख्या वस्तूंच्या ब्रँडिंगमध्ये ही बाब जाणवते. साधे घरगुती चपातीसाठी लागणा-या पिठाचे उदाहरण घेतले, तरी चागंला गहू विकत आणणे, निवडणे, गिरणीतून दळून आणणे, अशा कंटाळवाण्या क्रिया केवळ तयार ब्रँडेड’ दर्जेदार पीठ घेऊन टाळता येतात. ही बाब ब्रँडिंग व जाहिरातीद्वारे ग्राहकांच्या मनावर ठसवता येते. साखरेचे ब्रँडिंग करताना अद्यापही ग्राहकांना किराणा दुकानात मिळणा-या तुलनेने स्वस्त साखरे ऐवजी विशिष्ट ब्रँडची तुलनेने महाग असणारी साखर का खरेदी केली पाहिजे हे मोठ्या प्रमाणावर ठसवता आलेले नाही. तरीही गंधकमुक्त साखर, ऑरगॅनिक साखर, दाणेदार पांढरीशुभ्र, स्वच्छ साखर, ब्राऊन साखर, देशी खांड या नावाने तसेच त्या त्या प्रकारे आपले विशिष्ट वेगळेपण घेऊन काही ब्रँड देशात यशस्वी होताना दिसत आहेत.
रिटेलमधील तेजीमुळे ब्रँडेड साखरेच्या विक्रीला मदत होईल, असे बहुतेक या क्षेत्रातील प्रमुख उद्योजकांना वाटते. किराणा स्टोअर्समधून संघटित किरकोळ विक्रेत्यांकडे किरकोळ विक्रीमध्ये बदल केल्यास ब्रँडेड साखरेचा वापर आणखी वाढू शकेल, उत्पादनाचे व खपाचे निश्चित प्रमाण असले तरी भविष्यात ते वाढत जाणार आहे.

डी-मार्ट, रिलायन्स इत्यादी प्रसिद्ध मॉलमध्ये साखर कारखान्यांची साखर संबंधित कारखान्यांकडून होलसेल खरेदी करून मोठे मॉल आपल्या मॉलमध्ये त्यांचे 1, 2, 5, 10 किलोंच्या पिशव्यात पुन:वितरण मॉलच्या ब्रँडच्या नावाने करुन किरकोळ साखर विक्रीमध्ये प्रति किलो 1 ते 3 रुपये फायदा घेत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
साखर कारखान्यांना मिळू शकणार फायदा हे मॉल चालक उचलताना दिसत आहेत. हा फायदा साखर कारखान्यांना कसा घेता येईल, या बाबतही साखर कारखान्यांकडून प्रयत्न होणे आवश्यक आहे.

राज्यात सहकारी साखर कारखाने जर ते ब्रँडेड साखर विक्री करत असतील तर त्यांचे अर्धा किलो 1 किलोचे पॅक सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरणाकरिता शासन बाजारातून विकत घेईल, अशा प्रकारच्या योजना सहकारी साखर कारखान्यांसाठी भविष्यात राबवण्याबाबत विचार होऊ शकतो. अशा योजनाद्वारे शासन साखर कारखान्यांना भविष्यात प्रोत्साहन देण्यासाठी विचार करु शकते. अशा प्रकारे ब्रँडेड साखरेच्या विक्रीतून सहकारी साखर कारखान्यांना अतिरिक्त मूल्य मिळू शकेल. साखर ब्रँडिंगचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल आहे. मात्र त्यासाठी या क्षेत्रातील धुरिणांनी याबाबत मनावर घेणे आवश्यक आहे.

Supant Sugar
Supant Sugar Brand

इतर उत्पादनांचेही ब्रँडिंग शक्य
देशी दारू उत्पादनाची पूर्वी लायसन्स मिळालेले पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सहकार महर्षी शंकरराव गेनुजी कोल्हे सहकारी साखर कारखाना यांचे देशी दारूचे ब्रँड्स अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहेत; तथापि साखर कारखान्यानी तयार केलेली सेंद्रिय खते, विनासे, द्रवरूप पोटॅश खत, सीबीजी, बायो कंपोस्टिंगची उत्पादने, इतकंच नव्हे; तर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रियेत निर्माण होणारी रासायनिक उत्पादने सुक्रोज, लॅक्टिक सिड, ग्लिसरीन, सॉर्बीटॉल, सायट्रिक अ‍ॅसिड, इस्टर्स, फॅटी अ‍ॅसिड, डेसिव्हज, रेसीन्स, स्पेशल डाएट फुड, भुसा किंवा बगॅसपासून निर्माण केली जाणारी अनेक उत्पादने यांचेही ब्रँडिंग करणं आणि ते विकण्याबाबतही साखर कारखाना स्तरावर बारकाईने विचार विनिमय होणे आवश्यक आहे..
एखादा ब्रँडची प्रसिद्धी त्या वस्तूचा असलेला दर्जा या बरोबरच त्या ब्रँडचे नाव, केलेली जाहिरात, विपणन शृंखला किंवा पद्धती, यामुळे होतो.. अशाप्रकारे ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केल्याने उत्पादन खर्चापेक्षा जास्त किंमत लावूनही ग्राहक अशा वस्तू न चुकता खरेदी करण्यावर भर देतो. अशा ब्रँडिंगचाही भविष्यात सूक्ष्म पद्धतीने अभ्यास विचार व अंमलबजावणी सहकारी साखर कारखान्यांनी केल्यास त्यांना ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ किंमत सुद्धा त्या वस्तूंची मिळू शकते, यात मला शंका नाही.

  1. मालकीचा पुरावा: एक ब्रँड मालकीचा पुरावा म्हणून काम करतो, ज्यामुळे विवादांचे निराकरण करणे सोपे होते.
  2. गुणवत्ता हमी: एक ब्रँड गुणवत्ता किंवा मानक पातळी दर्शवू शकतो, खरेदीदारांना उत्पादनाच्या मूल्याची खात्री देतो.
  3. भिन्नता : ब्रँडिंगमुळे तुमचे साखर उत्पादन बाजारातील इतरांपेक्षा वेगळे करण्यात ग्राहकांच्या मनात तसे ठसवण्यास निश्चितच मदत होते.
  4. ओळख : एक मजबूत ब्रँड ओळख तुमचे उत्पादन ओळखण्यायोग्य आणि लोकांच्या दृष्टीने संस्मरणीय बनवते.
  5. निष्ठा : ब्रँडिंग ग्राहकांची निष्ठा वाढवू शकते, या नावाच्या उत्पादनाचे परत परत खरेदी करण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देते.
  6. प्रीमियम प्रतिमा : प्रभावी ब्रँडिंग तुमच्या साखरेला प्रीमियम उत्पादन म्हणून स्थान देऊ शकते, ब्रँडिंग करून बाजारात उपलब्ध किरकोळ विक्री पेक्षा या उत्पादनाला लावलेल्या उच्च किंमतीचे समर्थन होते.
  7. विपणन संधी : ब्रँडिंग सर्जनशील विपणन मोहिमा आणि जाहिरातींसाठी संधीची दारे उघडते.
  8. विश्वास : एक सुस्थापित ब्रँड सातत्यपूर्ण गुणवत्ता सुनिश्चित करून ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करू शकतो. काही दिवसांनी ब्रँडच्या नावानेच ती कंपनी ओळखली जाऊ शकते.
  9. विस्तारित वितरण : एक मजबूत ब्रँड वितरक आणि किरकोळ विक्रेत्यांना आकर्षित करू शकतो, ज्यामुळे तुमच्या उत्पादनाची पोहोच वाढते.
  10. स्पर्धात्मक फायदा: ब्रँडिंग आणि जाहिराती तुम्हाला साखर बाजारातील प्रतिस्पर्ध्यांपेक्षा आपल्या उत्पादनाचा खप वाढवण्यास मदत करू शकतात.
  11. स्वत: उत्पादित केलेल्या साखरच्या ब्रँडिंगमुळे आणि तिची विशिष्ट जाहिरात केल्यामुळे उत्पादनाला अधिक किंमत देखील मिळू शकते आणि लोकांपर्यंत दूर दूरवर नाव जातं त्याचा फायदा एकूणच उत्पादनाला मिळतो.
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »