एमडी मुलाखती : सरकार, साखर आयुक्तांना नोटिसा, १८ ला पुढील सुनावणी

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी तयार करण्यात येत असलेल्या ‘एमडी’ पॅनलसाठीच्या मुलाखत प्रक्रियेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता येत्या १८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. तसेच महाराष्ट्र सरकार, साखर आयुक्त आणि वैकुंठ मेहता संस्थेला नोटिसा बजावून १८ ला उत्तर देण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
रेणापूर येथील शरद साळुंके आणि इतर आठ जणांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. त्यावर १५ जुलै रोजी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्यासमोर प्रारंभिक सुनावणी झाली. त्यानंतर पुढील सुनावणी १८ जुलै रोजी घेण्यात येईल, असे खंडपीठाने सांगितले. विशेष म्हणजे पुण्याच्या वैकुंठ मेहता संस्थेत १८ जुलैपासूनच पात्र इच्छुक ७४ उमेदवारांच्या मुलाखतींची प्रक्रिया सुरू होत आहे. १८, १९ आणि २२ असे तीन दिवस मुलाखती चालणार आहेत.
शरद साळुंके आणि अन्य आठ जणांनी ॲड. पी. पी. मोरे यांच्यामार्फत सादर केलेल्या याचिकेत, ही रिट याचिका स्वीकारावी, मुलाखत प्रक्रियेला स्थगिती द्यावी, तसेच या नऊ वादींना मुलाखतींसाठी बोलवावे इ. मागण्या करण्यात आल्या आहेत. आता सर्वांचे १८ जुलैच्या सुनावणीकडे लक्ष लागले आहे. एका पदाकरिता तीन उमेदवारांना मुलाखतींसाठी बोलावण्याचा शासकीय नियम असताना, केवळ ७४ उमेदवारांनाच त्यासाठी पात्र ठरवले आहे, असा दावा अर्जदारांनी केलेला आहे.