एमडी मुलाखतींना आव्हान, १५ ला सुनावणी
पुणे : एमडी पॅनल तयार करण्यासाठी येत्या १८ जुलैपासून होणाऱ्या मुलाखतींसमोर कायदेशीर अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या मुलाखतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून, त्यावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी एमडी पॅनल तयार करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. ५० जणांचे एमडी पॅनल करण्याचे लक्ष्य आहे. मात्र अनेक कारणांमुळे ते पूर्ण होऊ शकलेले नाही. त्या दिशेने गेल्या दोन-तीन वर्षांत ठोस प्रयत्न झाले. न्यायालयीन अडचणींचा सामना करत ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आणि येत्या १८, १९ आणि २२ जुलै रोजी ७४ पात्र इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निश्चित करण्यात आल्या. मात्र त्यासमोर पुन्हा कायदेशीर अडचणी उभ्या ठाकतात की काय, अशी शंका निर्माण झाली आहे.
रेणापूर (जि. लातूर) येथील शरद साळुंके आणि अन्य आठ जणांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिकेत मुलाखतींच्या पद्धतीला आक्षेप घेतला आहे. ५० जणांचे पॅनल करायचे आहे आणि मुलाखतींना केवळ ७४ जणांना बोलावले आहे, हे चुकीचे आहे. नियमानुसार एका जागेसाठी किमान तीन जणांना मुलाखतींसाठी निमंत्रित करायला हवे, या न्यायाने दीडशे जणांना मुलाखतींना बोलवायला हवे होते, असा दावा अर्जदारांनी याचिकेत केला आहे. ॲड पी. पी. मोरे यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
त्यावर येत्या १५ जुलै रोजी खंडपीठाच्या कोर्ट क्र. १ मध्ये सुनावणी होणार आहे. यामध्ये एक मूलभूत बाब अशी आहे की, एमडी पॅनल तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत ७४ उमेदवारच उत्तीर्ण झाले होते. पुढील मुलाखतींसाठी ते पात्र ठरले. एकास तीन या प्रमाणे मुलाखती घ्यायला कोणाची हरकत नाही, मात्र तेवढे उमेदवार पात्रच ठरले नाहीत तर त्याबाबत ही प्रक़्रिया राबवणाऱ्या यंत्रणेने करायचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जातो.
आता १५ जुलैच्या सुनावणीकडे संपूर्ण सहकारी साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे. पण यापूर्वीच्या अशा पद्धतीच्या केसेसवर नजर टाकली असता, कोर्टाकडून नियोजित मुलाखत प्रक्रिया थांबवली जाण्याची शक्यता नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.