एमडी मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत
पुणे : सहकारी साखर कारखान्यांसाठी होत असलेल्या ‘एमडी’ मुलाखतींचे दोन टप्पे सुरळीत पार पडले, मुलाखतींची शेवटची फेरी सोमवारी होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
या मुलाखत प्रक्रियेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने, या विषयाकडे संपूर्ण साखर उद्योगाचे लक्ष लागले होते. मात्र पहिल्या दोन्ही दिवशी कसलीही आडकाठी न येता, मुलाखत प्रक्रिया सुरळीतपणे सुरू राहिली.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांसाठी कार्यकारी संचालक (एमडी) पॅनल तयार करण्यासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. चाळणी आणि प्रमुख परीक्षांनंतर मुलाखतींची प्रक्रिया १८ जुलै २०२४ रोजी सुरू झाली. लेखी परीक्षा आणि मुलाखत प्रक्रियेची जबाबदारी राज्य सरकारने पुण्यातील वैकुंठ मेहता सहकार प्रशिक्षण संस्थेकडे सोपवली आहे. संस्थेने पात्र ७४ उमेदवारांच्या १८, १९ आणि २२ जुलै रोजी मुलाखती ठेवल्या. त्यानुसार मुलाखती सुरू झाल्या आहेत.
१८ आणि १९ रोजी ४८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या. त्यासाठी मोठे मुलाखत पॅनल नेमण्यात आले आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, १२ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पाच इच्छुक उमेदवारांनी या मुलाखत प्रक्रियेला आव्हान दिले. ५० जणांचे पॅनल तयार करायचे आहे आणि त्यासाठी केवळ ७४ उमेदवारांना मुलाखतींसाठी पाचारण करण्यात आले आहे. त्यामुळे मुलाखतींची १:३ उमेदवार बोलावण्याच्या सरकारी नियमाचा भंग झाला आहे, असा दावा या रिट याचिकेत करण्यात आला आहे.
त्यावर १५ जुलै रोजी प्राथमिक सुनावणी झाली व पुढील सुनावणी १८ जुलै रोजी निश्चित करण्यात आली होती. ‘शुगरटुडे’ने अर्जदारांचे वकील पी. पी. मोरे यांच्याशी संपर्क साधून रिट याचिकेची सद्यस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ठोस माहिती मिळू शकली नाही. तसेच १८ जुलै रोजीच्या सुनावणीची माहिती शुक्रवारी उशिरापर्यंत कोर्टाच्या वेबसाइटवर अपलोड झाली नव्हती.