5,000 CBG प्लांट्सचे उद्दिष्ट, साखर उद्योगाला मोठी संधी
पुणे : देशात पाच हजार सीबीजी अर्थात बायोसीएनजी प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे, मात्र केवळ ६१ प्रकल्प उभे राहिले आहेत, असे नमूद करताना, ही संधी साखर उद्योगाने सोडू नये, असे आवाहन ‘मेडा’तर्फे आयोजित बैठकीत करण्यात आले.
साखर उद्योगातील प्रेस मडपासून सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) तयार करण्यासाठी भागधारकांची बैठक साखर संकुलामध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी नॅचरल शुगरचे संस्थापक आणि प्रमुख, विस्माचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सीबीजी प्रकल्पांसमोरील अडचणी मांडताना, सरकारला यशस्वी अंमलबजावणी करायची असेल तर उत्तर प्रदेशच्या मॉडेलचा अभ्यास करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील साखर उद्योगांमध्ये प्रेस मडपासून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) तयार करण्याच्या क्षमतेवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने (MEDA) या बैठकीचे आयोजन केले होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी कादंबरी बलकवडे,( MEDA च्या महासंचालक), श्री कुणाल खेमनार (साखर आयुक्त) श्री. रवींद्र बिनवडे ( कृषी आयुक्त) श्री. पंकज तगलपल्लेवार (अतिरिक्त DG MEDA) श्री. राजेश सुरवसे ( संचालक साखर) श्री अविनाश देशमुख, (सहसंचालक साखर), श्री. संजय खताळ (महाराष्ट्र साखर संघाचे एमडी) आदींची उपस्थिती होती.
या बैठकीला पेट्रोलियम कंपन्यांचे प्रतिनिधी, प्रकल्प विकसक, साखर कारखान्यांचे प्रतिनिधीही उपस्थित होते.
बैठकीत इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे श्री. पटेल, प्राज इंडस्ट्रीजचे श्री. पाटील आणि श्री. बी बी ठोंबरे यांनी सादरीकरण केले. त्यांनी साखर कारखान्यांतील प्रेस मड आणि इतर जैव-कचरा वापरून CBG प्लांट उभारण्याच्या तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर चर्चा केली.
भारताचे 5,000 CBG प्लांट्स बसवण्याचे उद्दिष्ट आहे, परंतु सध्या महाराष्ट्रात फक्त 7 प्लांट्स सोबत देशात फक्त 61 प्लांट चालू झाले आहेत, याकडे यावेळी लक्ष वेधण्यात आले.
श्री कुणाल खेमनार यांनी आपल्या प्रास्ताविकात साखर कारखान्यांना सीबीजी प्लांट्स बसवण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, गेल्या हंगामात 1,075 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून, महाराष्ट्रात सुमारे 43 लाख टन प्रेस मड तयार करण्याची क्षमता आहे, ज्याचा वापर . CBG उत्पादनासाठी केला जाऊ शकतो.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि नॅचरल शुगर्सच्या प्रतिनिधींनीही CBG प्लांट्स उभारण्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी योजनांबद्दल माहिती दिली आणि त्यांचे अनुभव मांडले.
प्रश्नोत्तर सत्रानंतर, MEDA च्या महासंचालक कादंबरी बलकवडे यांनी सर्व भागधारकांच्या सूचनांचा आढावा घेतला आणि आश्वासन दिले की महाराष्ट्रातील साखर उद्योगांमध्ये CBG प्लांट्सच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यासाठी MEDA एक सर्वसमावेशक राज्य धोरण तयार करेल. एकदा धोरण लागू झाल्यानंतर सर्व भागधारकांसोबत चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.