विषय फसवणुकीचा : चेअरमन, एमडींची बैठक बोलवणार : आ. शिंदे
सोलापूर : ऊस तोडणी मजूर पुरवणारे मुकादम हे वाहनमालक, शेतकऱ्याकडून लाखो रुपये उचल घेतात व मजूर पुरवठा न करता वाहन मालकाचे पैसे बुडवतात, तसेच कांही मजूर मधूनच पळून जातात यासंबंधी हे मुकदम कोणतीही जबाबदारी घेत नाहीत, अशा तक्रारी वाढल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांचे चेअरमन आणि एमडींची बैठक बोलावण्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी ठरवले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 30 ते 32 साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन मालकांचे मुकादमांनी मागील एका गळीत हंगामात 125 कोटी रुपये रक्कम बुडवलेली आहे, यापूर्वी अनेक वर्ष अशाच प्रकारे वाहन मालकांचे कोट्यावधी रुपये मुकादमांनी बुडवले आहेत, अशा तक्रारी आहेत.
याबाबत आमदार शिंदे म्हणाले, की साखर कारखान्यांनी मजूर महामंडळांना पैसे पुरवावेत व महामंडळाने स्वतःच्या जबाबदारीवर ऊस तोडणी मजूर पुरवावेत . मुकादम कडून फसवणूक झालेल्या वाहन मालकाची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेत नाहीत, उलट मुकादम व मजुरांनी केलेली तक्रार दाखल करून घेतात व अशा प्रकारे माढा तालुक्यातील रिधोरे व उमाटे अंजनगाव येथील वाहन मालकांना तुरुंगवास भोगण्याची पाळी आलेली आहे.
त्यामुळे फसवणूक झालेल्या वाहन मालकांनी केलेल्या तक्रारीचे गुन्हे ज्या त्या हद्दीतील पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून घेतलेच पाहिजेत यासाठी आपण जिल्ह्यातील सर्व कारखान्यांचे चेअरमन सहित जिल्हा पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहोत.
यासंदर्भात सर्व साखर कारखान्याचे चेअरमन , मॅनेजिंग डायरेक्टर व शेतकी अधिकारी यांची लवकरच बैठक बोलावणार आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.