‘यशवंत’च्या जमीन विक्रीस सभासदांचा विरोध

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांनी गावोगावी सभा घेऊन ११७ एकर जमीन विक्री करण्याच्या प्रस्तावाला कडाडून विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या वार्षिक सभेत जमीन विक्रीचा प्रस्ताव पारित होणार, का मोडीत निघणार, याकडे साखर उद्योगाचे लक्ष लागले आहे.
कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा २६ फेब्रुवारीला आयोजित केली आहे. सभेत ११७ एकर जमीन विकण्याचा आणि त्यातून नवा कारखाना उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
कारखान्याची निवडणूक पार पाडून नवीन संचालक मंडळ स्थापन होऊन वर्षपूर्ती झाली. अद्याप कारखान्याची स्थितीही ‘जैसे थे’ तशीच आहे. या कारखान्याच्या पुन्हा उभारणीसाठी संचालक मंडळाकडून हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीला जमीन विक्री संदर्भात एक प्रस्ताव पणन महामंडळास दिला गेला होता मात्र, तो पणन महामंडळाने फेटाळला. सभासदांना विचारात घेऊन ही प्रक्रिया रीतसर करण्याचा आदेश संचालक मंडळाला देण्यात आला.

दरम्यान, सर्वसाधारण सभेत या प्रश्नांवर तोडगा निघणार का याबाबत उत्सुकता शिगेला पोचली आहे. संचालक मंडळाने सर्व आर्थिक व्यवहार सभासदासमोर पारदर्शकपणे मांडण्याची गरज आहे. नव्याने कारखान्याच्या सभासदांची सर्वसाधारण सभा घेऊनच नवीन ठराव मंजूर करून तो प्रस्ताव साखर आयुक्तांच्या मंजुरीनंतरच पुन्हा सादर करण्याचा निर्णय पणन महामंडळाने दिला आहे. त्यामुळे संचालक मंडळाकडून हा वार्षिक सभेचा घाट घातला आहे. वार्षिक सभेतल्या निर्णयावर कारखाना पुन्हा उभारणार की गंजत राहणार हे अवलंबून आहे.

कारखान्याची जमीन विकण्यातच संचालकाना एव्हढा रस का, असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. दुसरीकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने दिलेल्या प्रस्तावमागे नेमके काय इंगित आहे, याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहे. कारण सुभाष सह. संस्थेने बाजार समितीला प्रस्ताव देऊन , सरकारी जागेला प्राधान्य द्यावे असे नमूद केले आहे. (याबाबत सविस्तर वृत्त लवकरच .. )

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »