‘यशवंत’च्या जमीन विक्रीला वाढता विरोध

पुणे : ‘यशवंत’च्या संचालक मंडळाचा जमीन विक्री करून कारखाना चालू करणे हा निर्णय सहकारातील त्यांचा अभ्यास कमी असल्याचे लक्षण आहे. कारखान्याला भविष्यात ऊस उत्पादन मोठे असून, संचालक मंडळाने इतर मागनि कारखाना चालू करणे अपेक्षित असताना मनमानी करून जमीन विक्रीचा विषय घेतला आहे. आम्ही सभासद जमीन विक्रीचा डाव हाणून पाडू, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नेते प्रा. के. डी. कांचन यांनी दिला आहे.
थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची जमिनीची विक्री पुणे बाजार समितीला करण्यासाठी संचालक मंडळाने आयोजित केलेल्या (दि. २६) सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत कांचन यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले , कारखाना सुरू झाल्यानंतर कारखान्याकडे ५० एकर जमीन असताना कारखान्याने २५० एकर अधिकची जमीन परिसरातील शेतकऱ्यांच्या सहकार्यातून खरेदी केली आहे. या जमिनीवर कारखान्याचा बेणे प्लॉट, प्रेसमड प्लॉट अशा कारणांसाठी खरेदी केली आहे. मात्र, ती जमीन विक्री करणे कारखान्याचे नुकसान करणे आहे. त्यापेक्षा जिल्ह्यातील इतर कारखाने छत्रपती, कर्मयोगी, भीमा-पाटस कारखान्यांप्रमाणे कर्जाचा व्यवहार्य मार्ग काढून कारखाना सुरू केला पाहिजे.
समितीचे राजेंद्र चौधरी म्हणाले, कारखान्याने जमीन विक्रीचा मुद्दा सभासदांपुढे बेकायदेशीर मांडला आहे. सभासदांना जमिनीचे प्रचलित बाजार, बाजार मूल्यांकन, दर सभेपूर्वी देणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. कारखान्याच्या ऑडिट रिपोर्टनुसार ११० कोटी कर्ज व देणी असतील तर संचालक मंडळाने कारखाना सुरू करण्यासाठी ३०० कोटींची आवश्यकता कशासाठी सांगितली, हा खरा प्रश्न आहे.
अजिंक्य कांचन म्हणाले, संचालक मंडळाने जमीन विक्री हाच एकमेव पर्याय सभासदांवर लादला आहे. वास्तविक, संस्था शेजारच्या भीमा पाटसप्रमाणे भाडेतत्त्वावर देऊ केला असता, घोडगंगा कारखान्याप्रमाणे कर्जाचा विचार करणे अपेक्षित होते, सभासदांशी चर्चा करून अन्य पर्याय निवडणे आवश्यक होते. .