हंगामापूर्वी साखरेचा किमान हमीभाव ४ हजार शक्य

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल मागवला
पुणे : साखरेच्या किमान हमीभावात वाढ करावी, म्हणून देशभरातील साखर कारखान्यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला आहे. यापार्श्वभूमीवर केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी नुकताच याबाबतचा प्रत्यक्ष उत्पादन खर्च अहवाल मागवला आहे. यासंदर्भात येत्या १५ दिवसांत खासदारांचे शिष्टमंडळही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन साखरेचा किमान ४ हजार रुपये हमीभाव करण्याची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, त्यामुळे साखरेला किमान ४ हजार रुपये हमीभाव हंगामापूर्वी मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
देशांतर्गत बाजारपेठेत साखरेला चांगली मागणी असून आगामी दसरा, दिवाळी सण पाहता अजून केंद्र सरकारने सप्टेंबरचा साखर तेजी राहू शकते. सध्या विक्री कोटा २३.५ लाख टन दिला असला तरी बाजारातील साखरेची मागणी आणि शिल्लक साखर पाहता आगामी काळात दरात वाढ होण्याची शक्यता आहे
दसरा-दिवाळीत साखर कडाडणार
कारखान्यांकडून आताच प्रतिक्विंटल ३,९०० रुपयांनी साखरेची विक्री सुरू असल्याने कारखान्यांना अच्छे दिन आले आहेत. त्यामुळे आगामी दसरा, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर आणखी साखरेच्या दरात आणखी भाव वाढ होऊ शकते. बाजारात समतोल राहावा, यासाठी केंद्र सरकार देशातील कारखान्यांना साखर विक्रीचा कोटा ठरवून देत असते. सध्या बाजारातील मागणी, देशात सध्या सप्टेंबरच्या कोट्यासह ६५ लाख टन शिल्लक साखरेचा कोटा आणि दसरा-दिवाळीचा सण पाहता साखरेला आणखी तेजी येणार आहे.
इथेनॉल दरवाढीची मागणी
देशातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मिती प्रकल्पासाठी ४० हजार कोटीची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे इथेनॉल आयातीला साखर उद्योगाने विरोध केला आहे. आगामी हंगामात इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न करताना केंद्र सरकारने त्याच्या दरात वाढ करण्याची मागणी होत आहे.