ऊसतोड मजुरांचा तालुका ही शिरूरची ओळख पुसून टाकणार : धनंजय मुंडे
बीड : ऊसतोड मजूर अन् दुष्काळी तालुका म्हणून शिरूरची ओळख आहे; परंतु ही मला पुसायची आहे. तुम्ही मागणी कराल, त्यापेक्षा अधिक निधी शिरूरला देणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
ते शिरूर पंचायत समिती इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते. यावेळी आ. बाळासाहेब आजबे तसेच अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते. शिरूर पंचायत समितीला इमारत नसल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून तहसील कार्यालयाच्या तळघरातून पंचायत समितीचा कारभार सुरू होता.
शासनाकडून सुमारे साडेतीन कोटींच्या निधीतून पंचायत समितीची सुसज्ज अशी भव्य इमारत वारणीला डोंगराच्या कुशित बांधण्यात आली. मंगळवारी या इमारतीचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटात पार पडला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, तहसीलदार डॉ. बिपीन पाटील, गटविकास अधिकारी संजय केंद्रे, राजेंद्र नेटके, डॉ. अशोक गवळी, डॉ. शिवाजी राऊत, उपअभियंता राजपुत, सतीश शिंदे, दशरथ वणवे, बाबुराव केदार, कृष्णा पाणसंबळ, गहिनाथ शिरसाट, दिपक झुंबरे, नवनाथ ढाकणे, बाळासाहेव केदार, अक्षय जाधव, वारणीच्या सरपंच प्रियंका केदार, ज्ञानदेव केदार, डॉ. बडजाते यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक अविनाश पाठक यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी ७६ कोटीच्या रस्ते व इमारत बांधकामाचा शुभारंभ धनंजय मुंडे यांनी केला. मागणीपेक्षा अधिक विकासकामे दुसऱ्या वेळेस येताना घेऊन येतो असे सांगून शिरूर तालुक्यावर स्व. गोपीनाथराव मुंडे यांचे प्रेम होते. येथून फारशी मागणी नसताना देखील त्यांनी तालुका निर्माण करून विकासाचा पाया रचला होता.
त्यांच्या स्वप्नातील शिरूर तालुका व विकास कामाचा कळस काढण्याची माझी जबाबदारी मी पूर्ण करेल असा शब्द धनंजय मुंडे यांनी दिला. फक्त लाईटचे ट्रान्सफॉर्मर अभावी इमारत पूर्ण होऊनदेखील तीन वर्ष वापरता आली नव्हती, असे ते म्हणाले. कामाबाबत निधी देण्याची जबाबदारी माझी मात्र ते काम दर्जेदार करून घेण्याची तुमची जबाबदारी आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आघाव तर आभार प्रदर्शन नितीन तिजोरे यांनी केले. पंचायत समिती लोकार्पण सोहळ्यावेळी तालुक्यातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती.