मुलासाठी आईचा राजीनामा, नीरज मुरकुटे तज्ज्ञ संचालक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहिल्यादेवीनगर : अशोक सह. साखर कारखान्याचे सर्वेसर्वा माजी आमदार भानुदास मुरकुटे यांची तिसरी पिढी साखर उद्योग क्षेत्रात आली आहे. सिद्धार्थ मुरकुटे यांचे चिरंजीव नीरज यांची नुकतीच अशोक कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी निवड करण्यात आली आहे. नीरजने राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी त्यांच्या मातोश्री मंजुश्री मुरकुटे यांनी राजीनामा दिला.

नुकतीच अशोक कारखाना कार्यस्थळावर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उपस्थिती संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी कोंडिराम उंडे, पुंजाहरी शिंदे, सोपान राऊत आदी उपस्थित होते. सुरवातीला आमदार हेमंत ओगले यांचा मुरकुटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर कारखान्याच्या स्वीकृत संचालिका मंजुश्री मुरकुटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त जागेवर त्यांचे चिरंजीव नीरज यांची स्वीकृत संचालक तज्ज्ञ म्हणून निवड करण्यात आली आहे.

स्नुषा मंजुश्री यांना दोनदा स्वीकृत संचालक म्हणून संधी दिली. तसेच आपला राजकीय वारस म्हणून पहिल्यापासून नीरज यांच्यावर लक्ष केंद्रित केले होते. छोट्या-मोठ्या कार्यक्रमातून नीरज यांनी आपल्यातील वक्तृत्व कौशल्याची चुणूक दाखवून दिली आहे.

मितभाषी असलेल्या नीरज यांनी आता स्वीकृत संचालक पदाच्या माध्यमातून साखर कारखानदारीचे धडे गिरविण्यासाठी आजोबांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात केली आहे. मुरकुटे यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे तीनवेळा प्रतिनिधित्व केले. तसेच गेल्या ३५ वर्षांहून अधिक काळ ते अशोक कारखान्याची धुरा सांभाळत आहेत.
नीरज मुरकुटे हे ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे पदवीधर असून, अर्थकारण हा त्यांच्या आवडीचा विषय आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »