साखरेची एमएसपी रू. ४२०० करा : खा. महाडिक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : बदललेल्या परिस्थितीचा विचार करून, साखरेची एमएसपी रू. ४२०० करावी, अशी आग्रही मागणी खासदार धनंजय ऊर्फ मुन्ना महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली आहे.

सन २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किंमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, अजुनही साखरेला प्रतिक्विंटल ३१०० रूपये इतकाच किमान आधारभूत दर आहे. एकिकडे साखरेचा उत्पादन खर्च वाढत आहे. तर त्याचवेळी शासनाकडून शेतकर्‍यांना दरवर्षी किमान ऊस दरामध्ये वाढ दिली जाते. पण त्याप्रमाणात साखर कारखान्यांसाठी साखरेची एमएसपी वाढवली जात नाही. गेल्यावर्षी उसाची किमान एफआरपी ३१५० रूपये होती. यंदा ही एफआरपी वाढली जाईलच. पण त्याचवेळी साखरेचा उत्पादन खर्च क्विंटलमागे ४१६६ रूपये इतका झालाय. त्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च आणि शेतकर्‍यांना द्यावयाची किमान आधारभूत किंमत, यांचा विचार केला, तर साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. अनेक कारखान्यांना कर्ज काढून, शेतकर्‍यांना एफआरपीची रक्कम द्यावी लागते. त्यामुळे साखरेच्या किमान आधारभूत वाढ किंमतीमध्ये ३१०० रूपयांपासून ४२०० रूपये प्रतिक्विंटल इतकी वाढ करावी, अशी मागणी खा. महाडिक यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे केली.

इथेनॉलच्या दरातही प्रति लिटर पाच रूपये वाढ करणे गरजेचे आहे, या मुद्दयाकडे त्यांनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. सन २०२३-२४ या वर्षात देशात साखरेचा तुटवडा निर्माण होईल, या शक्यतेने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला बंदी घातली. आता ही बंदी उठवली असली, तरी इथेनॉलच्या दरातही वाढ करणे गरजेचे आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »