राज्य बँकेच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना फटका बसणार
मुंबई : आधीच यंदाचा अडचणींचा हंगाम, त्यात केंद्राचे चिंता वाढवणारे निर्णय आदींमुळे साखर उद्योग क्षेत्रासमोर संकटे उभी राहिली असतानाच, राज्य बँकेने प्रति क्विंटल साखर मूल्यांकनात रुपयांची घट केली आहे. त्यामुळे या उद्योगासमोरील अडचणी आणखी वाढणार आहेत.
खुल्या बाजारात साखरेचे दर घसरल्याचे कारण देत, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने साखरेच्या मूल्यांकनात १०० रुपयांनी घट केली आहे. दोनच महिन्यांपूर्वी साखरेचे मूल्यांकन ३४०० रुपये केले होते.
मार्चपासून हे मूल्यांकन ३३०० रुपये असेल. नव्या मूल्यांकनानुसार कारखान्यांना प्रति क्विंटल २९७० रुपये इतकी उचल मिळेल. बँकेच्या या निर्णयामुळे कारखान्यांच्या अडचणीत वाढच होणार आहे, अशी नाराजी साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. अनेक कारखान्यांनी यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार असल्याने भविष्यात साखरेचे दर वाढतील, या अपेक्षेने उत्पादकांनी एफआरपी पेक्षाही जादा दर दिला आहे. अशा कारखान्यांची चिंता वाढणार आहे.
बाजारात मुबलक प्रमाणात साखर साठा असल्याने दरात सातत्याने घसरण होत आहे. त्यातच राज्य बँकेचा हा निर्णय साखर उद्योगाची अस्वस्थता वाढवणार आहे. एफआरपी बिले प्रदान करण्यावर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो, असे साखर उद्योगाचे मत आहे.