विठ्ठल कारखान्याच्या २० संचालकांवर गुन्हा दाखल
राज्य सहकारी १८९ कोटी रुपये थकविल्या प्रकरणी तक्रार
पंढरपूर : ज्येष्ठ नेते अध्यक्ष शरद पवार यांचे सोलापुरातील समर्थक विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह विद्यमान २० संचालकांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. राज्य सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. राज्य बँकेचे सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी याबबत पंढरपूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
अभिजित पाटील हे शरद पवार यांचे कट्टर समर्थन म्हणून ओळखले जातात. २०२३ मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांचे पॅनल निवडून आले होते. सध्या अभिजित पाटील पंढरपूरजवळच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. या कारखान्यातील पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतले होते. या कर्जाची रक्कम तब्बल साडेचारशे कोटींहून अधिक आहे.
बँकेने वेळोवेळी नोटीस देऊनही संचालक मंडळाने कर्जाची परतफेड केली नाही. कारखान्याने सन २०२२- २०२३ व २०२३-२०२४ या आर्थिक वर्षात तयार झालेली साखर, उपपदार्थ विकून जवळपास टॅगिंग १८९ कोटींपेक्षा जास्त रक्कम बँकेला टॅगिंगप्रमाणे न भरता ती इतर कामासाठी वापरून बँकेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. बँकेच्या तक्रारीनुसार पंढरपूर शहर पोलिसांनी अभिजित पाटील यांच्यासह २० संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.