केंद्रीय सहकार राज्यमंत्री संशयाच्या भोवऱ्यात

राजू शेट्टी यांचे आरोप मोहोळ यांनी फेटाळले, शेट्टी आरोपांवर ठाम
पुणे : येथील एचएनडी जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीवरून केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कथित तीन हजार कोटींच्या जमीन विक्री प्रकरणामागे मोहोळ यांचाही हात आहे, असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी आ. रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्याला मोहोळ यांनी दोन दिवसांनी प्रत्युत्तर देत सर्व आरोप खोडून काढले. दरम्यान, शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर नव्याने आरोप केले.
रविवारी (१९ ऑक्टोबर २०२५) दुपारी पत्रकारांशी बोलताना मोहोळ यांनी या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आणि हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगून ते फेटाळून लावले आहेत.
पुणेकरांना सत्य जाणून घेण्याचा हक्क: मोहोळ
मागील आठवड्यात आपण पुण्यात नव्हतो, पण बातम्या आणि लेखांमधून आपल्याबद्दल अनेक गोष्टी वाचायला मिळाल्या, असे मोहोळ यांनी सांगितले. आपण केवळ राजू शेट्टी किंवा एका विशिष्ट पुणेकराने (धंगेकर यांचे नाव घेणे टाळून) आरोप केल्यामुळे स्पष्टीकरण देत नसून, ज्या पुणेकरांनी आपल्याला मतदान केले आणि ज्यांचा आपल्यावर विश्वास आहे, त्यांच्यासाठी आपण हे सत्य सांगत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. पुणेकरांच्या मनात या आरोपांमागील सत्य काय आहे, असा प्रश्न निर्माण झाला असेल, म्हणूनच आपण या विषयावर सखोल माहिती घेऊन हे स्पष्टीकरण देत आहोत, असे मोहोळ म्हणाले.
मोहोळ यांच्यावरील आरोप काय आहेत?
राजू शेट्टी आणि रवींद्र धंगेकर या दोघांनीही मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
- शेट्टी यांनी शिवाजीनगर येथील मॉडेल कॉलनी परिसरातील जैन बोर्डिंग हाऊसच्या मालमत्तेशी संबंधित ३,००० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यात मोहोळ यांचा सहभाग असल्याचा आरोप केला आहे.
- ही मालमत्ता गोखले कन्स्ट्रक्शनमार्फत केवळ २३० कोटी रुपयांना विकण्यात आली आणि मोहोळ यांच्या पाठिंब्यामुळे गोखले बिल्डरला हे शक्य झाले, असा आरोप त्यांनी केला.
- शेट्टी यांनी या व्यवहाराला बेकायदेशीर ठरवून जैन समाजाची फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.
- धंगेकर यांनी या आरोपांचे समर्थन करत, मोहोळ यांना “भूखंड चोर” म्हटले आणि बिल्डरांना फायदा मिळवून देण्यासाठी त्यांनी राजकीय सत्तेचा वापर केल्याचा आरोप केला.
जैन बोर्डिंग जमीन व्यवहारावर मोहोळ यांची बाजू
मोहोळ यांनी आरोपांचे खंडन करताना सांगितले की, जैन बोर्डिंग हाऊस जमीन व्यवहार प्रकरणात जो विक्री करार झाला, तो पुणे येथील गोखले बिल्डर्सने खरेदी केला.
- आपण गोखले बिल्डर्समध्ये भागीदार असल्याचा आरोप आपल्यावर करण्यात आला असला तरी, आपण लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात कृषी व्यावसायिक असल्याचे आणि दोन फर्ममध्ये बांधकाम व्यवसायात गुंतलेले असल्याचे घोषित केले होते.
- आपण मागील १५ ते २० वर्षांपासून बांधकाम व्यवसायात आहोत आणि आपला व्यवसाय स्वच्छ आहे, लपवण्यासारखे काही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
- प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीनुसार, गोखले बिल्डरसोबत आपल्या दोन लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप (LLP) फर्म्स होत्या.
- या जैन बोर्डिंग हाऊसच्या विषयासंबंधी, आपण २५ नोव्हेंबर २०२४ रोजी या दोन्ही एलएलपीमधून राजीनामा दिला आणि बाहेर पडलो. या संदर्भात आपल्याकडे दस्तऐवज उपलब्ध आहेत.
- या दोन भागीदारी फर्म्सपैकी एक २०२२ मध्ये तर दुसरी २०२३ मध्ये स्थापन झाली होती. मात्र, या एलएलपी फर्म्समधून आपण राजीनामा देण्यापूर्वी एक रुपयाचाही व्यवहार झाला नव्हता, याची कोणीही पडताळणी करू शकते, असे मोहोळ यांनी नमूद केले.
- जैन बोर्डिंगच्या विश्वस्तांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी ही जमीन विकासकाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वृत्तपत्रांमध्ये निविदा सूचनाही जारी करण्यात आली.
- संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावर गोखले यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी ही जमीन अधिग्रहित केली. मोहोळ यांनी विचारले की, व्यवहार ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाला आणि आपण २०२४ मध्येच बाहेर पडलो, मग या प्रकरणाशी आपला संबंध कोठे येतो?
शेट्टींबद्दल आदर, धंगेकरांवर टीकास्त्र
मोहोळ यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील शेतकरी नेते’ असा करत त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. मात्र, शेट्टी यांनी एवढा मोठा आरोप करण्यापूर्वी आपल्याशी बोलले असते, तर आपण त्यांना सत्य सांगितले असते आणि त्यांनी असे विधान केले नसते, असे मोहोळ म्हणाले.
रवींद्र धंगेकर यांचा नाम उल्लेख टाळत त्यांनी ‘बिळातून बाहेर आलेले उंदीर’ अशी संभावना केली. धंगेकर आणि मोहोळ यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती, ज्यात मोहोळ विजयी झाले होते. धंगेकर यांनी मार्च २०२५ मध्ये काँग्रेस सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मोहोळ आणि धंगेकर दोघेही सध्या महायुतीत आहेत. महायुतीत वाद निर्माण होऊ नये, यासाठी मोहोळ यांनी धंगेकर यांच्यावर थेट टिप्पणी करणे टाळले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील भेटीत धंगेकर यांना महायुतीत फूट पाडू नये, असे आवाहन केले असतानाही, धंगेकर आपले आरोप सुरूच ठेवत आहेत. तसेच, धंगेकर यांनी आपले पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलल्यानंतर संभाव्य व्हिसलब्लोइंगचे संकेतही दिले आहेत.
दरम्यान, राजू शेट्टी एका स्थानिक बातमी वाहिनीशी बोलताना म्हणाले की, मी मोहोळ यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहे. ही जागा गोखले कंस्ट्रक्शनला अत्यंत कमी किमतीत मिळतेच कशी? मुख्यमंत्र्यांनी या प्रक़रणात लक्ष घालून जैन समाजाला न्याय दिला पाहिजे.
धंगेकरांची पत्रपरिषद
मोहोळ यांच्यानंतर रवींद्र धंगेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, मुरलीधर मोहोळ यांचा या प्रकरणात खुलासा पाहिला त्यात ते किती हतबल झालेत हे दिसून येते. महाराष्ट्रातील कुठे काय रेट आहेत हे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. मुरलीधर मोहोळ ज्याप्रकारे विषय मांडतात, भाजपा म्हणून मी बोलत नाही. पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. १९५८ मध्ये जैन बोर्डिंगने जमीन खरेदी केली होती. गोरगरिबांची मुले तिथे शिकली पाहिजेत त्यासाठी वसतिगृह बनवण्यात आले होते. मात्र काही ट्रस्टींना हाताशी धरून जमिनीचा जो व्यवहार झाला तो संशयास्पद आहे. निवडणुकीपासून ही जमीन हडपण्याचा प्लॅन सुरू होता. २१ नोव्हेंबर २०२३ ला श्रीराम जोशींनी चॅनलला मुलाखत दिली होती. या जागेचे २३० कोटी मिळू शकतात हे सांगितले. टेंडर काढण्याआधीच १५ टप्प्यात पैसे मिळणार हे सांगितले होते. विशाल गोखले आणि इतरांसोबत मुरलीधर मोहोळ महावीर जयंतीला तिथे कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी तिथल्या जमिनीवर त्यांचा डोळा पडला. १३ डिसेंबर २०२४ ला सर्व संचालकांची बैठक झाली. त्यानंतर तीन दिवसांनी ही जमीन विकायची हा ठराव झाला. मात्र त्याआधीपासून जमिनीचा व्यवहार करायचा हे ठरले होते असं त्यांनी सांगितले.
तसेच १६ डिसेंबरच्या ठरावानंतर जमिनीबाबत टेंडर प्रक्रिया सुरू झाली. त्यात ३ ठेकेदार आले. त्यात लांजेकर, बडेकर आणि तिसरे गोखले आले. तिघांचे अर्ज एकाच ठिकाणी टाईप करण्यात आले. त्यात संबंधित जमिनीची एक किंमत ठरवण्यात आली होती. मात्र लांजेकर, बडेकर या कंपन्यांनी त्या रक्कमेच्या खालची किंमत अर्जात दिली. ही सर्व मिलिभगत होती. या जमिनीसाठी लिलाव किंमत लांजेकर १८० कोटी, बडेकरांनी २०० कोटी तर गोखले यांनी २३० कोटी अशी रक्कम भरली होती. टेंडर कसे भरायचे हे मुरलीधर मोहोळ यांना चांगले माहिती होते. एवढी मोठी जमीन विकताना केवळ ३ कंपन्यांनीच अर्ज भरले होते. या तिन्ही कंपन्या मुरलीधर मोहोळ यांच्याच जवळच्या आहेत. मोहोळ केविळवाणा प्रयत्न करत आहेत. जैन मंदिरावर दरोडा टाकण्याचं काम मोहोळ यांनी केले. जे विद्येचे माहेर घर आहे ते लुटारूंचं माहेर घर झालं असा घणाघात रवींद्र धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर केला.
दरम्यान, पुण्याचे खासदार कलमाडी यांच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा त्यांच्या पक्षाने राजीनामा घेतला. कालांतराने न्यायिक प्रक्रियेत ते सुटले पण त्या काळात कलमाडींवर कारवाई करण्याचे धाडस काँग्रेस पक्षाने केले. भाजपानेही या प्रकरणात ईडीची चौकशी करून ट्रस्टी आणि त्यांच्याशी संगनमत करणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवणार असून या प्रकरणात ज्यांनी चुकीचे काम केले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार आहे. जे या प्रकरणात दोषी आहेत त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि चौकशीला सामोरे गेले पाहिजे अशी मागणीही रवींद्र धंगेकर यांनी केली.