किल्लारी कारखान्याच्या नामकरणास एकमताने मंजुरी

किल्लारी : नीळकंठेश्वरांच्या साक्षीने येथील येथील किल्लारी साखर कारखाना उभा राहिला आहे. अनेक अडचणी आल्या, पण त्यावर मात केली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारखाना शेतकऱ्यांच्या संकल्पाने पुन्हा उभा राहतो आहे. गतवर्षी कारखाना अडचणीमुळे बंद ठेवावा लागला होता. त्यावेळी ऊस संत शिरोमणी कारखान्याकडे वळविण्यात आला. या वर्षी ३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य असून, कोणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही, अशी ग्वाही आ. पवारांनी देत किल्लारी साखर कारखान्याचे आता श्री नीळकंठेश्वर शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी असे नामकरण या ऐतिहासिक ठरावासह अन्य १० महत्वाच्या विषयांना आ. पवारांच्या उपस्थितीत सभासदांनी रविवारी आयोजित सर्वसाधारण सभेत एकमताने मंजुरी दिली.
सभेच्या प्रारंभी शहीद जवान व मयत सभासदांना श्रद्धांजली अर्पण करून सुरू झालेल्या विशेष बैठकीत किल्लारी साखर कारखान्याच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षस्थानी आ. अभिमन्यू पवार होते. मंचावर डी. एल. पतंगे, काकासाहेब मोरे, सुभाष जाधव, प्रवीण फडणीस, समृद्ध जाधव, जाधव, चंद्रशेखर सोनवणे, अॅड. परीक्षीत पवार, टी. एन. पवार, प्रकाश पाटील, काकासाहेब मोरे, प्रकाश पाटील, राम पाटील, गोविंद भोसले, बालाजी निकम व सर्व खाते प्रमुख यांच्यासह कारखाना सभासद, शेतकरी, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुकाराम पवार यांनी विषयपत्रिका वाचून दाखवली. सभासदांनी प्रत्येक मुद्द्याचे स्वागत टाळ्यांच्या गजरात करत संमती दर्शवली. जिल्हा उपनिबंधक समृध्द जाधव यांनी कारखान्याच्या कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन केले. पि.आर. फडणीस यांनी कारखान्याची गाळप क्षमता १२५० टीसीडीवरून थेट २५०० टीसीडी केली आहे. आजघडीला ८० टक्के काम पूर्ण असून, १५ ऑक्टोबरपासून ट्रायल गाळप सुरू होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.