भाऊराव चव्हाण कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र चव्हाण

नांदेड: भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी उद्योजक नरेन्द्र भगवानराव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे.
खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या या कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली होती. दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या गणपतभाऊ तिडके यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी त्यांच्या रिक्त जागी नरेंद्र चव्हाण यांची निवड झाली. ते यापूर्वी उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होते.
नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रातील एकमेव साखरनिर्मिती उद्योग अशी ओळख सांगणाऱ्या या कारखान्यामध्ये आधी मोहनराव पाटील मुदखेडकर आणि त्यांच्यानंतर गणपतभाऊ तिडके या ग्रामीण आणि कृषी पार्श्वभूमीच्या मातीतील कार्यकर्त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या घराण्यातील एक व्यक्ती प्रथमच अध्यक्षपदी विराजमान झाली आहे.अध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया विश्वास देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण झाली. केवळ चव्हाण यांचाच अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड देशमुख यांनी जाहीर केली.